गणेश मंडळांचा सामाजिक उपक्रमाला नकार!

गणेश मंडळांचा सामाजिक उपक्रमाला नकार!

नागपूर- स्वातंत्र्यलढ्यात लोकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. मात्र, कालौघात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाठीमागे असलेली सामाजिक उपक्रमाची संकल्पना लोप पावली. उपराजधानीतील बहुतांश गणेश मंडळांनी समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या संकल्पाचेच विसर्जन केले आहे. लोकमान्यांच्या संकल्पनेतील गणेशोत्सव विसरलेल्या मंडळांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना स्वेच्छेने शालेय साहित्य देण्याचे आवाहन करण्यासदेखील नकार दिला आहे.

मागील वर्षापासून उपराजधानीमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यासाठी भाविकांना आवाहन करण्याचा चांगला उपक्रम नागपूरकर युवकांनी सुरू केला आहे. या अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात एक बॉक्‍स आणि बॅनर लावण्यात येतो. ज्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी स्वत:च्या इच्छेने शालेय विद्यार्थ्यांना आवश्‍यक असलेले साहित्य देण्याचे आवाहन करण्यात येते. अनेक गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक विवंचनेमुळे वही, पेन, पेन्सिल आदी शालेय जीवनात दैनंदिन उपयोगात येणाऱ्या वस्तू खरेदी करणे अशक्‍य आहे. त्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून ‘प्रयास हम सबका’ या संघटनेने पुढाकार घेत मागील वर्षापासून ‘गणेशाजवळ वही पेन्सिल’ असा अभिनव उपक्रम सुरू केला. यामध्ये काही तुरळक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सामाजिक जाणीव हरविलेल्या बहुतांश मंडळांनी मात्र या उपक्रमाला ‘खो’ देत वाहतुकीला खोळंबा करणारे भव्य मंडप आणि नागरिकांना त्रास होईल, असे कानठळ्या बसणाऱ्या ढोल-ताशांनाच पसंती दिल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. 

उपक्रमात सहभागी झालेली मंडळे  
आजघडीला फार थोडक्‍या मंडळांनी या उपक्रमामध्ये सहभागी होत मंडळामध्ये बॉक्‍स आणि बॅनर लावला आहे. यामध्ये संती गणेश उत्सव मंडळ (सीए मार्ग), बिट्‌स ग्रुप गणेशमंडळ (तिरंगा चौक), होलसेल क्‍लॉथ मार्केट गणेश उत्सव मंडळ (गांधीबाग), द्वारकामाई शिव गणेश उत्सव मंडळ (शांतीनगर कॉलनी), विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ (महाल), एकदंत गणेश उत्सव मंडळ (विणकर कॉलनी, मानेवाडा), एसीसी सिमेंट कॉर्पोरेट ऑफिस (धरमपेठ) यांचा समावेश आहे. इच्छुक भाविक या मंडळांना भेट देऊन गरजू विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक असलेले शालेय साहित्य देऊ शकतात. तसेच ज्या मंडळांना उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी विनायक खांडवे (९०२११६३७५७) या क्रमांकावर संपर्क साधावा.

...तर पैसे कोण देणार? 
संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी ‘गणेशाजवळ वही पेन्सिल’ या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाना केले. यापैकी बऱ्याच जणांनी ‘भाविक वही पेन्सिल आणतील तर पैसे कोण देणार?’ या शब्दांमध्ये बोळवण केली. तर अनेकांनी या उपक्रमाला परवानगी नाकारत त्याकडे पाठ फिरविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com