काँग्रेसचा वाह्यातपणा कधीपर्यत सुरू राहणार?: भांडारकर

निखिल भुते
सोमवार, 17 जुलै 2017

"संघ, भाजपचा संबंध नाही' 
"इंदू सरकार' आणि रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भेटीचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करत मला स्वस्त प्रसिद्धीची गरज नसल्याचे भांडारकर यांनी सांगितले. तसेच माझे भाजप, कॉंग्रेससह सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचेही ते म्हणाले.

नागपूर : "इंदू सरकार' या चित्रपटाला सुरू असलेला विरोध हा काँग्रेसने स्वस्त लोकप्रियता मिळविण्यासाठी सुरू केलेला वाह्यातपणा आहे. हा वाह्यातपणा कधीपर्यंत सुरू राहणार असा सवाल रविवारी (ता. 16) दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केला. तसेच कुठल्याही व्यक्तीवर आधारित नसलेल्या काल्पनिक चित्रपटाची काँग्रेसला इतकी भिती का वाटावी, याबाबत देखील त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यामुळे रविवारी संपूर्ण दिवसभर मधुर भांडारकर, अभिनेत्री किर्ती कुल्लारी यांची दमछाक उडाली. यामुळे त्यांना पत्रकारांशी देखील संवाद साधता आला नाही. अखेर मुंबईला परत जाण्यापूर्वी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर बोलले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधत चित्रपटाला सुरू असलेला विरोध स्वस्त लोकप्रियतेचा फंडा असल्याचे स्पष्ट केले. "इंदू सरकार' हा 70 टक्के काल्पनिक असून 30 टक्के भाग हा वास्तवावर आधारित आहे. हा सिनेमा भाजप प्रायोजित चित्रपट नाही. तसे असते तर लोकसभा निवडणूकीपूर्वी चित्रपट प्रदर्शित केला असता, असे भांडारकर म्हणाले.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कोणत्याही राजकीय नेत्याला दाखविण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नसल्याचे स्पष्ट करत भांडारकर यांनी कॉंग्रेसच्या मागणीला धुडकावून लावले. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून 17 कट लावण्यात आले आहेत. याविरुद्ध भांडारकर यांनी अपिल केले आहे. अपीलावर निर्णय आल्यानंतर तो कुणाला दाखवायचा याचा निर्णय घेण्यात येईल. कॉंग्रेसने संकुचित वृत्ती न ठेवता लोकांना चित्रपटाचा निर्णय घेऊ द्यावा, अशी अपेक्षा भांडारकरांनी व्यक्त केली. 

"संघ, भाजपचा संबंध नाही' 
"इंदू सरकार' आणि रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भेटीचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करत मला स्वस्त प्रसिद्धीची गरज नसल्याचे भांडारकर यांनी सांगितले. तसेच माझे भाजप, कॉंग्रेससह सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचेही ते म्हणाले. 

"आम्ही प्रचंड दहशतीत' 
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विरोधामुळे आम्हाला पोलिसांच्या संरक्षणात रहावे लागत आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गोष्टी करणाऱ्या या देशात इतकी दहशत असणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री किर्ती कुल्लर हिने दिली. आम्ही प्रचंड दहशतीत असून कुणाच्या व्यक्तीस्वातंत्र्यांवर घाला घालू नये, असे आवाहन तिने प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले.

Web Title: Nagpur news Madhur Bhandarkar criticize congress