सुरेश भट सभागृह हवे, आधी पन्नास हजार मोजा! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नागपूर - रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहाचे भाडे २४ ते ६० हजार रुपयांपर्यंत आकारण्यात येणार आहे. भाड्यावर १८ टक्के जीएसटीही आकारण्यात येईल. मात्र, कार्यक्रमाच्या आयोजकास सुरुवातीलाच ५० हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागतील. शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुटीच्या दिवशी सभागृहाच्या भाड्यात दीडपट वाढ करण्यात येणार आहे. अनामत रकमेतून भाड्याची संपूर्ण रक्कम वजा करून उर्वरित रक्कम आयोजकास परत केली जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शाळा आदींसाठी पाच हजारांत सभागृह उपलब्ध करून देण्याबाबत उद्‌घाटनादरम्यान सूचना केल्या होत्या. 

भट सभागृहासाठी भाडे व नियमावली तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली होती. या समितीने नियमावली व भाड्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला असून, २७ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. समितीने डिसेंबर २०१७ पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ही नियमावली व भाडे प्रस्तावित केले असून पुढील दोन महिन्यांत विद्युत शुल्क, पाणी शुल्क, स्वच्छता व देखरेख शुल्क आणि उत्पन्नाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर पुन्हा दर निश्‍चित केले जातील, असे प्रस्तावात नमूद केले. पुढील अडीच महिन्यांसाठी तयार नियमावलीनुसार प्रायोगिक नाटक, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्यासह व्यावसायिक नाटक, ऑर्केस्ट्रा, फॅशन शो, सभा, संमेलन, परिषद, बालनाट्य, स्थानिक हौशी नाटके आयोजित  करायची असल्यास आयोजकांना ५० हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून सभागृहाच्या व्यवस्थापकाकडे जमा करावे लागतील. वेगवेगळ्या सत्रासाठी वेगवेगळे भाडे प्रस्तावित केले आहे. सकाळच्या सत्राचे भाडे सायंकाळच्या सत्राच्या भाड्यापेक्षा अधिक आहे. बाल्कनीसह व बाल्कनीशिवाय याप्रमाणे भाड्याचे दर प्रस्तावित आहेत. प्रायोगिक नाटक, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमासाठी सकाळच्या सत्राकरिता बाल्कनीसह २१ हजार रुपये अधिक ३७८० रुपये जीएसटी, असे एकूण २४ हजार ७८० रुपये भाडे आकारण्यात येईल. सायंकाळच्या सत्रासह ५५८० रुपये जीएसटीसह ३६ हजार ५८० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. व्यावसायिक कार्यक्रमासाठी सकाळच्या सत्राकरिता जीएसटीसह ३६ हजार ५८० तर सायंकाळच्या सत्राकरिता ५३ हजार १०० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

सभा, संमेलनासाठी ६० हजार रुपये 
सभागृहात सभा, संमेलन, परिषद, परिचर्चा आयोजित करण्यासाठी आयोजकांना सकाळच्या सत्राकरिता जीएसटीसह ४८ हजार ३८० रुपये तर सायंकाळच्या सत्रासाठी ६० हजार १८० रुपये भाडे द्यावे लागणार आहे. 

कार्यक्रम रद्द केल्यास भाडे विसरा
कार्यक्रम रद्द केल्यास आयोजकास भाड्याची रक्कम परत मिळणार नाही. कार्यक्रमाच्या निश्‍चित तारखेत बदल केल्यास सुरक्षा ठेवीतून २० ते ७५ टक्के रक्कमेची कपात केली जाईल. कार्यक्रम पुढे ढकलल्यास भाडे पुढे वर्ग करता येईल. परंतु परत मिळणार नाही. 

कालावधी वाढल्यास प्रतितास ११ हजार 
आयोजकाला कार्यक्रम आरक्षित वेळेतच पूर्ण करावा लागणार आहे. कार्यक्रमाची वेळ वाढल्यास प्रतितास ११ हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. ही रक्कम तत्काळ भरावी लागणार आहे.

प्रदर्शनाकरिता  भाडे ३५ हजार 
सभागृहाच्या पूर्व दिशेला ६०० चौरस मीटरची मोकळी जागा असून प्रदर्शनासाठी ती भाड्याने देण्यात येणार आहे. या जागेसाठी जीएसटीसह ३५ हजार ४०० रुपये भाडे आकारण्यात येईल. वीज, मंडपाचा आयोजकास वेगळा खर्च करावा लागणार आहे. 

Web Title: nagpur news Suresh Bhat Auditorium