नागरिकांच्या खिशात हात : नागपूर महापालिकेची पार्किंग शुल्कवाढीला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

सध्या दुचाकीसाठी पाच रुपये पार्किंग शुल्क आकारण्यात येते. आता त्यासाठी 10 रुपये तर चारचाकी वाहनासाठी 10 ऐवजी 20 रुपये पार्किंग शुल्क आकारण्यात येणार आहे.

नागपूर : शहरातील विविध बाजार व व्यावसायिक क्षेत्रातील वाहनतळावरील वाहन पार्किंगची वेळ आठ तास निश्‍चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त काळ वाहन पार्किंग केल्यास खिशाला अधिक ओझे पडणार आहे. एवढेच नव्हे आतापर्यंत नगरसेवकांच्या पत्राने घरातील खासगी सांडपाणी वाहून नेणारी नाली निःशुल्क स्वच्छ केली जात होती. त्यासाठीही नागरिकांना अडीचशे रुपये मोजावे लागणार आहे. राज्य शासनाने 60 रुपये प्रतिमहिना स्वच्छता शुल्कानंतर आता नागपूरकरांवर पार्किंग शुल्क व सांडपाणी नाली स्वच्छतेचाही भार पडणार आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज महापालिकेत पार पडली. पार्किंग शुल्कावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले असून सांडपाणी नाली स्वच्छतेवरील शुल्काचा प्रस्ताव सभागृहाकडे पाठविण्याची शिफारस केली. स्थायी समितीच्या या बैठकीत बडकस चौकातील पार्किंग प्लाझा, सोमवारीपेठ बुधवारी आठवडी बाजार, एस. टी. स्टॅण्डसमोरील शेतकरी भवन, सीताबर्डीतील नेताजी मार्केट, सुपर मार्केटमधील वाहनतळावर दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंगसाठी दुपटीने वाढ करण्यात आली. सध्या दुचाकीसाठी पाच रुपये पार्किंग शुल्क आकारण्यात येते.

आता त्यासाठी 10 रुपये तर चारचाकी वाहनासाठी 10 ऐवजी 20 रुपये पार्किंग शुल्क आकारण्यात येणार आहे. या दराला 2017 मध्येच मंजुरी देण्यात आली. हे दर आकारण्यासाठी यापूर्वी कालावधी निश्‍चित नव्हता. आता हे दर आठ तासांसाठी आकारण्यात येणार आहे. आठ तासांपेक्षा जास्त काळ वाहन पार्क केल्यास अतिरिक्त शुल्क घेण्यात येईल.

बाजारपेठेत सामान्य नागरिक तास, दोन तासांसाठी वाहने पार्क करीत असला तरी महाल किंवा सीताबर्डी येथील बाजारात दुकानांमध्ये काम करणारे गरीब कर्मचाऱ्यांची वाहने आठ तासांपेक्षा अधिक काळ तेथे असते. त्यामुळे त्यांना भुर्दंड पडणार आहे. दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच ते आठ हजार रुपये प्रतिमहिना मिळतो. त्यात आता पार्किंग शुल्काच्या नावावर त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे. स्थायी समितीने आज या वेगवेगळ्या वाहनतळासाठी पार्किंग शुल्क वसुलीकरिता निविदा मागविण्यास मंजुरी दिली.

एवढेच नव्हे आता घरामागील सिवेज लाइनपर्यंत मालमत्ताधारकाने तयार केलेली सांडपाणी वाहून नेणारी नाली तुंबल्यास, ती स्वच्छ करण्यासाठीही शुल्क आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत नगरसेवकांच्या पत्र दिल्यानंतर ही सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जात होती किंवा नाममात्र शुल्क आकारण्यात येत होते. आता मात्र यासाठी अडीचशे रुपये शुल्क आकारणीची शिफारस करीत प्रस्ताव सभागृहाकडे पाठविला. 

स्थायी समितीने केली कपात 
विशेष म्हणजे आरोग्य विभागाने सांडपाणी नाली स्वच्छतेसाठी पाचशे रुपये शुल्क आकारणीचा प्रस्ताव दिला होता. स्थायी समितीने त्यात 50 टक्के कपातीची सूचना केली. जेटिंग किंवा सक्‍शन मशीनने सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी आरोग्य विभागाने पाच हजार रुपये प्रस्तावित केले होते. स्थायी समितीने अडीच हजार सुचविले. त्यामुळे नागरिकांना अडीच हजार रुपये मोजावे लागणार आहे. अर्थात सभागृहाने मान्यता दिल्यानंतर हे दर लागू होईल, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी नमूद केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, nmc, parking, standing committee