मनपा स्थायी समिती अध्यक्षांसाठी साडेतेरा लाखांची कार!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

नागरिकांकडून वसूल करण्यात येणारा पैसा शहर विकासावर खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांच्या पैशातून पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान महागडी कार खरेदी केली जात आहे.

नागपूर : आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसाठी 13.63 लाखांची नवी कार खरेदी केली जाणार आहे. स्थायी समितीने आज नव्या कार खरेदीच्या खर्चास मंजुरी दिली. विशेष म्हणजे स्थायी समिती अध्यक्षांसाठी पाच वर्षांपूर्वी कार खरेदी कारण्यात आली होती. ती पाच वर्षांमध्येच भंगारात काढण्यात आल्याचे चित्र आहे.

महापालिका आता कुठे आर्थिक संकटातून सावरत आहे. नागरिकांवर आता पार्किंग शुल्कवाढ व मालमत्ताधारकांच्या खासगी सांडपाणी नालीच्या स्वच्छतेसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. नागरिकांकडून वसूल करण्यात येणारा पैसा शहर विकासावर खर्च करणे अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांच्या पैशातून पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान महागडी कार खरेदी केली जात आहे.

प्रस्ताव तत्काळ मंजूर

स्थायी समिती अध्यक्षासाठी टाटा हेक्‍झा ही कार खरेदीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने स्थायी समितीकडे पाठविला होता. स्थायी समितीने हा प्रस्ताव तत्काळ मंजूर केला. ही कार 13.63 लाखांची असून कारखाना विभागाकडून ही कार खरेदी केली जाणार आहे. विशेष म्हणजे स्थायी समिती अध्यक्षांसाठी पाच वर्षांपूर्वी कार खरेदी करण्यात आली होती.

पाच वर्षांत कार भंगारात

या कारमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत असल्याचे कारण नमूद करीत स्थायी समिती अध्यक्षांनी नव्या कारची मागणी केल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या प्रस्तावात नमूद आहे. त्यामुळे पाच वर्षांत स्थायी समिती अध्यक्षांची कार भंगारात निघाल्याचे चित्र आहे. दरवर्षी देखभाल दुरुस्तीवर मोठा खर्च केल्यानंतरही पाच वर्षांत कार भंगारात काढली जात असल्याने महापालिकेची उधळणही यानिमित्त पुढे आली आहे.

हेही वाचा - हे काय?... नागपुरी संत्रा चीनच्या प्रोटोकॉल यादीतच नाही
 

सरकारच्या निर्णयाला बगल

महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहन खरेदीसाठी राज्य सरकारने 6 लाखांची मर्यादा निश्‍चित केली आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये स्थायी समिती अध्यक्षांचाही समावेश आहे. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांसाठी वाहन खरेदीकरिता खर्चाच्या मर्यादा स्पष्ट नसल्याचे कारण पुढे करीत सरकारच्या निर्णयालाच बगल देण्यात आली आहे. नवीन कार खरेदीसाठी साडेसात लाखांचा अतिरिक्त खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur NMC president car 17.5 lakh