पोलिस आयुक्‍त का म्हणाले महापौरांवरील गोळीबार "चॅलेंजिंग केस'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार हे गतवर्षातील मोठे प्रकरण होते. हे प्रकरण सध्या नाजूक वळणावर आहे.

नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन दिवसांत ताब्यात घेतले जाईल, असा दावा करणारे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना आता ही केस चॅलेंजिंग वाटत आहे. ही घटना आम्ही गांभीर्याने घेतली आहे. येत्या काही दिवसांतच प्रकरणाचा छडा लागेल, असा विश्‍वास त्यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

डॉ. उपाध्याय म्हणाले, ""उपराजधानीतील गुन्हेगारी कमी झाली आहे. शेकडो गुन्हेगार कारागृहात आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईची संख्या वाढविण्यात आल्याने शहरातील गुन्हेगारी आटोक्‍यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कमी गुन्हे दाखल झाले आहेत. खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी, घरफोडी, प्राणांतिक अपघात अशा गुन्ह्यांसह बलात्कार, विनयभंग, खंडणी आणि फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही बरीच घट झाली आहे. 2018च्या तुलनेत 863 गुन्हे कमी घडलेले आहेत. महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार हे गतवर्षातील मोठे प्रकरण होते. हे प्रकरण सध्या नाजूक वळणावर आहे. जोशी यांना धमकीपत्रानंतर आयुक्‍तांनी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, जोशींनी सुरक्षा व्यवस्था नाकारली होती. ह्युमन इंटेलिजन्स वापरून हा गुन्हा सोडवू.''

मोक्‍का कारवाईत राज्यात "नंबर वन'
गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार करणाऱ्या कुख्यात गुंडांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कार्यकुशलतेमुळे तब्बल 13 गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामध्ये 65 कुख्यात गुंडांवर लगाम कसण्यात आली. तडीपार (एमपीडीए) कारवाईमध्येही वाढ झाली आहे. शहरात गुन्हे घडू नये म्हणून अनेक गुंडांवर एमपीडीएची (स्थानबद्ध) कारवाई करण्यात आली. 33 कुख्यात गुंडांना सध्या मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले आहे.

लाचखोरांवर कसणार लगाम
शहर पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. सामान्य नागरिकांनाही लाचेसाठी पोलिस त्रस्त करीत आहेत. त्यामुळे गतवर्षात एसीबीने 22 ट्रॅप करून जवळपास 41 पोलिस कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले. लाचखोरीवर काय उपाययोजना करण्यात येईल, या प्रश्‍नावर बोलताना आयुक्‍त म्हणाले की, डिफॉल्टर पोलिस कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. कुणाबाबत गुप्त माहिती मिळाल्यास, त्यावर निश्‍चितच कारवाई करण्यात येईल.

34 बंदुका आणि 52 बुलेट
शहरात शस्त्रांची तस्करी वाढली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने वारंवार कारवाई करीत 31 गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 41 आरोपींना बंदुकांसह अटक केली. तसेच 34 अग्निशस्त्रे आणि 52 काडतुसे पोलिसांनी जप्त केली. यामध्ये सर्वाधिक विदेशी बनावटीचे पिस्तूल 17, देशीकट्टे 10, रायफल 2, माऊजर 2 आणि 3 रिव्हॉल्व्हरचा समावेश आहे. शहरात अग्निशस्त्रांची खेप येऊ नये म्हणून विशेष योजना आखण्यात आली आहे.

पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष
शहर पोलिस दलात कार्यरत एएसआय ते शिपाईपदावर कार्यरत सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना हेल्थ कार्ड देण्यात येईल. तसेच त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार अ, ब, क अशी विभागणी करण्यात येणार आहे. अ गटात निरोगी, ब गटात मधुमेह, उच्चरक्तदाब तर क गटात हृदयविकार असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येईल. ब आणि क गटात समावेश असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पोलिस मुख्यालय, पोलिस नियंत्रण कक्ष व कर्मचारी कार्यरत असलेल्या संबंधित पोलिस ठाण्यात लावण्यात येईल. क गटात असणाऱ्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात येऊन त्यांना बंदोबस्त अथवा तणाव असलेल्या ठिकाणी तैनात करण्यात येणार नाही. या कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामासाठी तैनात करण्यात येईल. पोलिसांचे आरोग्य सृदृढ राहावे, यासाठीही विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, police commissioner, mayor, firing, crime