`त्या` पोलिस उपनिरीक्षकाने लाचेच्या रकमेसह पलायन केले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

लाचेच्या रकमेत तडजोड करीत 50 हजार देण्याचे निश्‍चित केले. पैसे देण्यासाठी दिवस निश्‍चित होताच पोलिस ठाण्यातच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने लाचेचे 50 हजार सोपविले. पण, त्याला कारवाईची शंका आली.

नागपूर : परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षकाने ठाण्यातच लाचेचे 50 हजार स्वीकारले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्याची शंका आली आणि त्याने लाचेच्या रकमेसह ठाण्यातून पलायन केले. परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षकाच्या कारनाम्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. शंकर बोंडे असे प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाचे नाव असून तो पाचपावली ठाण्यात नियुक्त आहे.

या प्रकरणातील रहिवासी रमाईनगर, नारी रिंगरोड येथील रहिवासी आहे. त्याने इंदोरा चौकातील जसवंत आयनॉक्‍स मॉल येथे दुकानाच्या खरेदीसंदर्भात करारनामा केला आहे. करारनाम्यात फसवणूक झाल्याचा मूळ मालकाचा आरोप असून त्यांनी पाचपावली ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास बोंडेकडे सोपविण्यात आला. त्याने 18 नोव्हेंबरला दोन्ही पक्षांना बोलावून घेतले होते. चौकशीनंतर तक्रारकर्त्याला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. गुन्हा टाळण्यासाठी 2 लाखांची मागणी केली. तक्रारकर्ता पैसे देण्यास तयार नसल्याने मारहाण करीत धमकावून त्याच दिवशी 90 हजार रुपये उकळले. उर्वरित 1 लाख 10 हजारांसाठी उपनिरीक्षकाने तगादा लावला होता. त्याला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. शहानिशा केली असता बोंडे लाचेच्या रकमेसाठी धमकावत असल्याने निष्पन्न झाले. एसीबी अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून तक्रारकर्त्याने लाचेच्या रकमेत तडजोड करीत 50 हजार देण्याचे निश्‍चित केले. पैसे देण्यासाठी आजचा दिवस निश्‍चित होताच पोलिस ठाण्यातच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराने लाचेचे 50 हजार बोंडेकडे सोपविले. पण, त्याला कारवाईची शंका आली आणि तो रक्कम सोबत घेऊन पळून गेला. बोंडेविरुद्ध पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीच्या शोधासाठी पाच पथके
आरोपी उपनिरीक्षक पळून जाताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर एसीबीच्या पथकाने बोंडेच्या घरीही छापा टाकला. पण, तो तिथेही आढळला नाही. त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. आरोपी उपनिरीक्षकाचा शोध घेण्यासाठी पाच पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, psi ran away with bribe, money