अनधिकृत मद्यसेवा देणाऱ्या सावजी व धाब्यावर धाड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

18 जणांनी मद्यपान केल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यांना सूचनापत्र देऊन सोडण्यात आले.

नागपूर : अनधिकृत मद्यसेवा देणाऱ्या सावजी व धाब्यावर धाड घालून 19 मद्यपींवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने संयुक्तरीत्या कारवाई केली. अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने हुडकेश्वर व अजनी पोलिस स्टेशन हद्दीतील पराते सावजी व देशी चुला बेसा रोड या हॉटेल्स व धाब्यावर पोलिस विभागास सोबत घेऊन सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर व सेवा देणाऱ्यांवर कारवाई केली. यात हॉटेल मालक विश्वास खुशाल टाकळीकर (वय 45, गोळीबार चौक), मॅनेजर विक्की वनवास पाटील (वय 32, न्यू वैशालीनगर) व 19 मद्यपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंदवून वैद्यकीय तपासणी केली. 18 जणांनी मद्यपान केल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यांना सूचनापत्र देऊन सोडण्यात आले. त्यांना 9 डिसेंबर 2019 रोजी न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

ही कारवाई जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी केली. कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक संतोष मुंडे व पोलिस स्टाफ तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रशांत येरपुडे, जवान नीलेश पांडे व राहुल पवार व जवान नि वाहनचालक राजू काष्टे, रवी निकाळजे आदींनी भाग घेतला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, raid on hotels providing illegal liquor