काटोलचे राकेश सोनटक्‍के युद्धसरावात शहीद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

राकेश सोनटक्‍के हे 502 आर्मी सप्लायर कोर आसाम डिगजाम येथे तैनात होते. वीस दिवसांपूर्वी नियमित युद्धसराव करीत असताना त्यांच्या डोक्‍याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

काटोल : येथील पेठबुधवारचा रहिवासी असलेल्या राकेश देवीदास सोनटक्‍के या सैनिकाचा युद्धसरावादरम्यान मृत्यू झाला. ते आसाम राज्यात तैनात होते. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच काटोलात शोककळा पसरली आहे. 

राकेश सोनटक्‍के हे 502 आर्मी सप्लायर कोर आसाम डिगजाम येथे तैनात होते. वीस दिवसांपूर्वी नियमित युद्धसराव करीत असताना त्यांच्या डोक्‍याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वीस दिवस उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांची रविवारी रात्री 11:50 वाजता प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी रुचिता, पृथ्वी हा एक वर्षाचा मुलगा, वृद्ध पिता, आई रेखा, थोरला भाऊ रोशन व धाकटा सूरज यांसह बराच मोठा आप्तपरिवार आहे. राकेश यांचे दोन भाऊ रोजमजुरीचे काम करतात, अशी माहिती मिळाली आहे. 

बुधवारी काटोल येथे अंत्यंसंस्कार 
कोलकाता येथून राकेश यांचा मृतदेह आणण्यात येत आहे. मृतदेह नागपूरला मंगळवारी रात्री पोहोचणार आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता पेठबुधवार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती काटोल सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे रत्नाकर ठाकरे यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, rakesh sontakke, soldier, indian army