कशी वाढणार टक्केवारी? "सावित्रीबाई शिष्यवृत्ती'ला लालफीतशाहीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

मुलींचा शिक्षणातील टक्का वाढण्याच्या शासनाच्या योजनेला एकप्रकारे हरताळच फासला जात असल्याचे दिसते. 

नागपूर : शिक्षणातील मुलींची टक्केवारी वाढविण्याठी सुरू केलेल्या सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेत अर्जदारांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे शिक्षणातील मुलींच्या टक्केवारीत वाढ झाल्याच्या शासनाच्या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असून ही योजनाच लालफीतशाहीत अडकल्याचे सांगण्यात येते. 

ओबीसी, अनुसूचित जाती, भटक्‍या जाती, विमुक्त वर्गातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शिक्षणावर खर्च येत असल्याने अनेक जण मुलींना शिक्षित करण्यास अनुत्सुक असल्याचे तपासातून समोर आले. हे प्रमाण वाढण्यासाठी शासनाकडून सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत 5 वी ते 10 वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येते. 5 ते 7 वीच्या वर्गातील मुलींना महिन्याला 60 रुपये तर 8 ते 10 वीच्या मुलींना महिन्याला 100 रुपये देण्यात येते.

अधिकारी करतात तरी काय?

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. यासाठी शाळा व शिक्षण विभागाचेही सहकार्य आवश्‍यक आहे. शाळांमार्फत शिष्यवृत्तीचे अर्ज येणे आवश्‍यक आहेत. मात्र शाळांकडून अर्जच पाठविण्यात येत नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे शिक्षण व समाजकल्याण विभागाकडूनही याबाबत फारसा पाठपुरावा होताना दिसत नाही. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. वर्ष 2015-16 ते वर्ष 2017-18 या तीन वर्षांच्या काळात शिष्यवृत्तीची अर्ज संख्येत वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. त्यामुळे अधिकारी करतात तरी काय, असाच सवाल उपस्थित होत आहे. मुलींचा शिक्षणातील टक्का वाढण्याच्या शासनाच्या योजनेला एकप्रकारे हरताळच फासला जात असल्याचे दिसते. 

कारवाईची शिफारस करण्यात येईल
अर्जांचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी तालुका स्तरावर कार्यशाळा घेऊन शाळांचे मुख्याध्यापक, शिष्यवृत्तीचा टेबल हाताळणारे अधिकारी यांना अर्ज भरण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. ज्या शाळा वेळेत पाठविणार नाही, किंवा ज्यांच्यामुळे मुली शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील, अशांवर कारवाईची शिफारस करण्यात येईल. 
-सुकेशनी तेलगोटे,
समाजकल्याण अधिकारी, जि.प. नागपूर. 

जनजागृती होणे आवश्‍यक
योजनेबाबत जनजागृती होणे आवश्‍यक आहे. मात्र समाजकल्याण किंवा शाळांकडून याची माहितीच विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही. मुली शिकूच नये, असाच यांचा प्रयत्न असल्याचा संशय वाटतो. 
-आशीष फुलझेले,
माहिती कार्यकर्ते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, savitribai phule scholarship, education, girls