नागपूर : किटअभावी दुसऱ्यांदा सिरो सर्वेक्षणाला थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिरो सर्वेक्षण

किटअभावी दुसऱ्यांदा सिरो सर्वेक्षणाला थांबा

नागपूर : जिल्ह्यात ३१ ऑगस्ट रोजी सिरो सर्वेक्षणाला सुरवात होणार होती. परंतु त्यावेळी किट खरेदी करण्यास उशीर झाल्याने तब्बल महिनाभरानंतर सर्वेक्षणाला सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात केवळ ७५० नागरिकांच्या रक्ताचे नमुने मेडिकल रुग्णालयातील प्रयोगशाळेत ॲन्टिबॉडी तपासणीसाठी पोचले आहेत. पुन्हा सिरो सर्वेक्षणासाठी आवश्यक किट संपल्या. यामुळे पुन्हा सर्वेक्षणाला थांबा लागला. विशेष असे की, ग्रामीण भागात एकाही व्यक्तीचे नमुने घेण्यात आले नसल्याची माहिती पुढे आली.

पाच ऑक्टोबरपर्यंत पुरवठादाराकडून किट्सचा मुबलक पुरवठा होणार असे खुद्द विभागीय आयुक्तांनी निवडक पत्रकारांशी साधलेल्या संवादात सांगितले होते. मात्र किट पोहचल्याच नाही.पहिल्या दोन सिरो सर्वेक्षणापेक्षा वेगळे सर्वेक्षण असल्याचे सांगण्यात आले होते. तिसऱ्या लाटेशी संबंधित तयारीसाठी या सर्वेक्षणाची मदत होणार होती. या सर्वेक्षणासाठी जिल्हात ६ हजार १०० व्यक्तींचे नमुने घेतले जाणार आहेत.

त्यात नागपूर महापालिका हद्दीतील १० झोनमधील प्रत्येकी ४ वार्डातील ७५ ते ८० जणांचे नमुने घेण्यात येतील. असे एकूण ३ हजार १०० नमुने गोळा केले जातील. ग्रामीणमध्ये १३ तहसीलमधून प्रत्येकी १ मुख्यालय व प्रत्येक तहसीलमधील दोन गावातून एकूण ३ हजार नमुने गोळा करण्यात येणार होती. सिरो सर्वेक्षणासाठी नमुने घेताना पहिल्या वयोगटात ६ ते १२ हा एक गट आहे. तर दुसरा गट १२ ते १८ वयोगटातील व्यक्तींचा आहे. तिसऱ्या गटामध्ये १८ ते ६० वयोगटातील व्यक्तींचे नमुने घेण्यात येतील. यानंतर चौथ्या गटात ६० हून अधिक वयोगटातील व्यक्तींचे नमुने घेण्यात येणार होते.

वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिशाभूल

तिसऱ्या सिरो सर्वेक्षणाला सुरवात झाल्यानंतर ७५० जणांचे नमुने शहरातून गोळा करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना छेडले असता, त्यांनी शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने मेडिकल रुग्णालयातील प्रयोगशाळेत ॲन्टिबॉडी तपासणीसाठी घेतले असल्याचे ठासून सांगितले होते. प्रत्यक्षात ग्रामीण भागातील एकाही व्यक्तीचे नमुने घेण्यात आले नसल्याचे उजेडात आले आहे. खुद्द वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच अशाप्रकारची दिशाभूल होत झाल्याचे पुढे आले.

टॅग्स :Nagpur