शाळेतील दुर्दैवी घटना़; खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

परीक्षा आटोपल्यानंतर दुपारच्या वेळी तो खेळण्यासाठी बास्केटबॉल कोर्टकडे जात होता. काही अंतर चालत जाताच तो भोवळ येऊन पडला आणि बेशुद्ध झाला.

नागपूर : शाळेच्या मैदानात खेळण्यासाठी जात असलेला विद्यार्थी अचानक भोवळ येऊन पडला आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी कळमेश्‍वर मार्गावरील जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडली. प्रणिश प्रशांत पाहुणे (14) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. इयत्ता 9 वीचा विद्यार्थी असलेला प्रणिश बास्केटबॉलचा खेळाडूसुद्धा होता. तो महालातील रहिवासी असून त्याचे आईवडील दोघेही शिक्षक असल्याचे कळते.

शाळा व्यवस्थापनाच्या दाव्यानुसार सीबीएसईतर्फे आयोजित आर्यभट्ट गणित चॅलेंजमध्ये तो सहभागी झाला होता. शुक्रवारी शाळेतच ही परीक्षा पार पडली. परीक्षा आटोपल्यानंतर दुपारच्या वेळी तो खेळण्यासाठी बास्केटबॉल कोर्टकडे जात होता. काही अंतर चालत जाताच तो भोवळ येऊन पडला आणि बेशुद्ध झाला. या प्रकाराने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. शिक्षकांनी तातडीने एका वाहनातून त्याला फेटरीतील सेंट जोसेफ हॉस्पिटल येथे नेले. डॉक्‍टरांनी प्राथमिक तपासणीनंतरच मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णालयातून त्याला मानकापूर येथील ऍलेक्‍सिस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण, रुग्णालयात पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता.

रुग्णालयाकडून मानकापूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मानकापूर पोलिसांनी तत्काळ रुग्णालय गाठत डॉक्‍टरांची विचारपूस केली. हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अभिप्राय डॉक्‍टरांनी व्यक्त केला असल्याचे मानकापूर पोलिसांनी सांगितले. घटनास्थळ कळमेश्वर हद्दीतील असल्याने हे प्रकरण कळमेश्वर पोलिसांकडे सोपविले जाणार आहे. या घटनेमुळे प्रणिशचे कुटुंबीय, मित्र आणि शिक्षकांना धक्का बसला आहे.

सीसीटीव्ही फुटेज जप्त करा
शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्वस्वी जबाबदारी शिक्षक व व्यवस्थापनाची आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाचा योग्य तपास व्हावा. वास्तविक स्थिती कळण्यासाठी पोलिसांनी शाळा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी जप्त करावेत, अशी मागणी आरटीई ऍक्‍शन कमिटीचे अध्यक्ष शाहिद शरीफ यांनी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, student died while playing in school