मधनिर्मिती व्यवसायाला नागपूर विद्यापीठ देणार उभारी, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर  

मंगेश गोमासे 
Tuesday, 19 January 2021

राज्य सरकारने मधनिर्मिती केद्राला बळकटी देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्राची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. 

नागपूर  ः शेतीपूरक व्यवसाय म्हणून असलेल्या मधमाशी पालन व्यवसायाला राजाश्रय मिळाला आहे. आता या व्यवसायाला उभारी देण्यासाठी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेही पाऊल टाकले आहे. त्यासाठी खादी आणि व्हीलेज इंडस्ट्रीअल कमिशनची तांत्रिक संस्था म्हणून काम करणार असून, त्यामुळे मध उत्पादन निर्मिती वाढविण्यासाठी मदत करणार आहे.

नागपूर जिल्ह्यासह विभागात मधनिर्मिती व्यवसायाकडे गांभीर्याने बघण्यात येत नाही. त्यामुळे येथील मधनिर्मिती इतर विभागाच्या तुलनेत थोडे कमी असल्याचे दिसून येते. मात्र, आता राज्य सरकारने मधनिर्मिती केद्राला बळकटी देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्राची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. 

अधिक वाचा - Breaking : कुरियर बॉय असल्याचे सांगत मुथूट फायनान्सवर दरोडा, साडेतीन किलो सोन्यासह लाखो रुपये लंपास
 

याशिवाय राज्यातर्फे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाशी पालक योजना राबविण्यात येणार आहे. यात आता विद्यापीठानेही वाटा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून खादी आणि व्हीलेज इंडस्ट्रीअल कमिशनची तांत्रिक संस्था म्हणून काम करणार आहे. विशेष म्हणजे मध निर्मिती वाढविण्यासाठी प्रकल्प तयार करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
 

विभागात २४०० किलोवर मधनिर्मिती

शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या मधनिर्मिती व्यवसायातून विभागात १४०० किलो मधनिर्मिती होत असते. यामध्ये काही प्रमाणात खासगी उद्योजकांचा समावेश आहे. हे मध संचालनालयाद्वारे खरेदी करण्यात येत असते. याशिवाय विभागात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूरच्या जंगल क्षेत्रात सेंद्रिय मध निर्मिती होताना दिसून येते. या क्षेत्रातून जवळपास एक हजार किलोवर मधनिर्मिती होताना दिसून येते.
 

पाच महिन्यांचा हंगाम

विदर्भात ऑक्टोबर महिन्यापासून फुलांचा हंगाम सुरू होतो. हा हंगाम जानेवारीदरम्यान असतो. त्यामुळे याच कालावधीत मधमाशा फुलांमधील परागकण शोषून घेत, त्यातून मधनिर्मितीची प्रक्रिया करताना दिसून येतात. पाच महिन्यांत मध संकलित करीत पावसाळ्यात मधमाशांना स्थलांतरित करावे लागते.
 

दोनच प्रजातींच्या मधमाशी पालनावर भर

नागपूर विभागात केवळ दोन प्रजातींच्या मधमाशांचे पालन करण्यात येते. यात सातेरी आणि मेनीफेरा (युरोपीय) या दोन मधमाशांचा समावेश आहे. आग्या माश्या जहाल असल्याने त्यांना पाळता येणे शक्य नाही. याशिवाय पोयाही मवाळ असली तरी ती विदर्भात पाळली जात नाही. मात्र, फुलोरी मधमाशी कमी रागीट असली तरी तिलाही पाळता येणे शक्य नाही. 

 

शेतीला जोडधंदा आणि लाभदायक व्यवसाय म्हणून मधमाशी पालन व्यवसायाकडे बघता येईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. विद्यापीठाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्याला निश्चितच उभारी मिळेल.
डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. 
 
संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur University help to increase honey production