१ लाख हेक्‍टर क्षेत्र होणार कोरडवाहू

अंकुश गुंडावार
सोमवार, 19 जून 2017

शहरावर पाणीटंचाईचे सावट - चौराई धरण फोडणार शेतकऱ्यांना घाम

नागपूर - आधीच नैसर्गिक संकटाना तोंड देत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कृत्रिम संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेश सरकारने पेंच नदीवर चौराई धरण बांधण्याचे काम सुरू केल्याने नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील १ लाख हेक्‍टर क्षेत्र कोरडवाहू होणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

शहरावर पाणीटंचाईचे सावट - चौराई धरण फोडणार शेतकऱ्यांना घाम

नागपूर - आधीच नैसर्गिक संकटाना तोंड देत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कृत्रिम संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेश सरकारने पेंच नदीवर चौराई धरण बांधण्याचे काम सुरू केल्याने नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील १ लाख हेक्‍टर क्षेत्र कोरडवाहू होणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

तोतलाडोह (पेंच प्रकल्प) हा मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील आंतरराज्य प्रकल्प आहे. या दोन्ही राज्यात १९६४ मध्ये पाणी वापरासंबंधी करार झाला. त्यानुसार या प्रकल्पाचे दोन तृतीयांश पाणी मध्य प्रदेश आणि एक तृतीयांश पाणी महाराष्ट्राला मिळत होते. 

त्यामुळे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील एक लाख हेक्‍टर शेतीला सिंचन, नागपूर शहराला पाणी पुरवठा आणि कोराडी व खापरखेडा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा केला जात होता. या प्रकल्पामुळे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिके घेणे शक्‍य होत होते. 

या प्रकल्पातून महाराष्ट्राला १२०० दलघमी पाणी मिळते. पण, मध्य प्रदेश सरकारने पेंच नदीवर चौराई धरण बांधण्याचा निर्णय घेतला. त्याचे कामदेखील सुरू आहे. या धरणामुळे आता महाराष्ट्राला केवळ ६०० दलघमी पाणी मिळेल. अर्धे पाणी कपात होणार असल्याने शेतीला सिंचनासाठी, नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याचा आणि कोराडी व खापरखेडा या वीज प्रकल्पांना मिळणाऱ्या पाण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. याचा सर्वाधिक फटका दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना बसणार असून तब्बल १ लाख हेक्‍टर क्षेत्र कोरडवाहू होणार असल्याने कृत्रिम दुष्काळाला तोंड देण्याची वेळ आली आहे. 

हा होऊ शकतो पर्याय
चौराई धरणामुळे निर्माण होणारे संकट टाळण्यासाठी पेंच नदीवर मध्य प्रदेशातील जामगडजवळील घोगली गावाजवळून ६५ किमीचा कन्हानपर्यंत बोगदा तयार करून ते पाणी पेंचमध्ये टाकल्यास या माध्यमातून जवळपास ३०० दलघमी पाणी मिळू शकते. या नदीजोड प्रकल्पासाठी २,५०० कोटी रुपयांचा खर्च आहे. तसा प्रस्तावदेखील सिंचन विभागाने शासनाकडे पाठविला असल्याची माहिती आहे. 

शहरावर पाणीटंचाईचे संकट
नागपूर शहराला सध्या पेंच प्रकल्पातून २०० दलघमी पाणीपुरवठा होतो. शहराला केला जाणारा पाणीपुरवठा बंद करून ते पाणी सिंचनासाठी द्या, अशी मागणीदेखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.
 

चौराई धरणामुळे निर्माण होणारे पाणीसंकट लक्षात घेता, त्यावर पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने
वापर आणि नदीजोड प्रकल्पातून यावर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.
- रसीक चव्हाण, मुख्य अभियंता, विदर्भ पाटबंधारे विभाग.

असे होणार नियोजन
चौराई धरणामुळे आता केवळ ६०० दलघमी पाणी मिळणार असल्याने त्यापैकी २०० दलघमी पाणी नागपूर शहराला पाणीपुरवठ्यासाठी, १७५ दलघमी कोराडी व खापरखेडा वीज प्रकल्पाला, उर्वरित १२५ दलघमी पाणी सिंचनासाठी ठेवले जाणारे आहे. यामुळे खरीप व रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पिकांचा पॅटर्न बदलविण्याची व काही क्षेत्र पडीक ठेवण्याचे संकट उभे टाकले आहे. 

अभ्यासासाठी समिती 
नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील १ लाख हेक्‍टर क्षेत्र कोरडवाहू होणार असल्याने हे टाळण्यासाठी काय पर्यायी उपाययोजना करता येईल. याच्या अभ्यासासाठी राज्य सकाराने सिंचन विभागाचे अधिकारी, खासदार, आमदार यांचा समावेश असलेली १३ सदस्यांची समिती गठित केली आहे.

Web Title: nagpur vidarbha news 1 lakh hector field dryland