नेत्रदानाबाबत समाजाचे डोळे मिटलेलेच!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

राज्यात अवघ्या 1,547 अंधांच्या डोळ्यांत पेरला उजेड

राज्यात अवघ्या 1,547 अंधांच्या डोळ्यांत पेरला उजेड
नागपूर - अंधांचे आयुष्यच निबिड काळोखाचे असते. हा अंधार दूर सारून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करून त्यांच्याही नजरेच्या टापूत सृष्टीचे सौंदर्य येणे महत्त्वाचे आहे. आपल्या संस्कृतीत स्वार्थ त्यागून गरजूंना केलेले दान सर्वश्रेष्ठ मानले जाते. मात्र, एक दान असंही आहे, जे मृत्यूनंतर करता येतं. ते म्हणजे नेत्रदान. मात्र त्याबाबत समाजाचे डोळे अद्याप मिटलेलेच आहेत. यावर्षी महाराष्ट्रात 4 हजार 875 नेत्रगोल गोळा झाले असून, 1,547 अंधांच्या डोळ्यांमध्ये उजेड पेरला गेलाय.

अंधत्वाचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे. देशात दीड कोटी अंध आहेत, त्या तुलनेत नेत्रदात्यांची संख्या कमी आहे. मोतीबिंदूमुळे अंधत्व येण्याचे प्रमाण 62 टक्के आहे. मोतिबिंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया सर्वत्र उपलब्ध असल्याने ही संख्या कमी होत आहे. कॉर्निया (बुबुळ खराब होणे) हे अंधत्वाचे जगातील आघाडीचे कारण आहे. त्याने सुमारे 25 टक्के लोकांना अंधत्व येते. भारतात बुबुळ खराब होण्यामुळे 30 लाख लोक अंधत्वाच्या खाईत आहेत. यात दरवर्षी 25 ते 30 हजार नवीन अंधांची भर पडते. सर्वाधिक चिंतेची बाब अशी की, यात 25 टक्के मुले आहेत.

डोळे अनमोल...
संगणकाच्या अतिवापराने डोळे कोरडे होतात. त्याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतात. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी लेझर उपचारपद्धती आहे. अनेकांना आय ड्रॉप्स टाकून किंवा प्राथमिक उपचारांचा फायदा होतो. परंतु, तो न झाल्यास पापण्यांवर लेझर उपचार केले जातात. त्याद्वारे पापण्यांना शेक दिला जातो. डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो. ही वेळ येऊ नये यासाठी दर सेकंदाला डोळ्यांची उघडझाप करावी, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिलाय. याशिवाय आहारात "अ' जीवनसत्त्वाचा अभाव, रसायने, व्यवसाय, अपघात, संसर्ग किंवा जन्मजात कारणे यांमुळे बुबुळ खराब होते. काही घटनांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर निष्काळजीपणाने बुबुळ निकामी होण्याची भीती असते. बुबुळामुळे आलेले अंधत्व दूर करण्यासाठी दरवर्षी सुमारे अडीच लाख बुबुळ प्रत्यारोपणाची आवश्‍यकता आहे. मात्र, भारतात दरवर्षी 40 ते 55 हजारच नेत्रदान होत असून, त्यातील 60 टक्के बुबुळ प्रत्यारोपण केली जातात.

शवविच्छेदनावेळी सक्‍ती हवी
देशात दरवर्षी सुमारे 75 लाख मृत्यू होतात. त्यातील केवळ 23 हजार व्यक्ती नेत्रदान करतात. म्हणजे 0.4 टक्के मृत्यूनंतर नेत्रदान करतात. शवविच्छेदन होणाऱ्या व्यक्तींसाठी सक्तीच्या नेत्रदानाचा कायदा केल्यास दरवर्षी शेकडो अंधांच्या डोळ्यात प्रकाश पेरला जाऊ शकतो. यावर्षी विदर्भात 1,156 नेत्रगोल गोळा झाले. त्यापैकी 168 व्यक्ती नेत्रदानाचे लाभार्थी ठरले. विदर्भात अद्यापही 2 हजार 50 व्यक्ती बुबुळाच्या प्रतीक्षेत आहेत.

पहिले नमन देवाला, नंतर बघितले आईला
नाव श्रेया. वय 16. डोळ्यांत टीक पडली आणि दृष्टी गेली. वय वाढत गेलं. आईवडिलांच्या डोळ्यांनीच ती बघायची. आईवडिलांनी खासगीपासून तर "मेडिकल'पर्यंत उपचारासाठी नेले. दहा वर्षांनंतर देव पावला. सहा महिन्यांपूर्वी "मेडिकल'मध्ये "दृष्टी' मिळाली. तिच्यासाठी ती दिव्यदृष्टीच ठरली. त्यानंतर ती म्हणाली, "ज्यांचे डोळे मला लावले, तीच व्यक्ती माझ्यासाठी देव आहे. ज्या डॉक्‍टरांनी माझ्यावर ऑपरेशन केले, तेही माझ्यासाठी देवच. माझे पहिले नमन नेत्रदात्याला, दुसरे डॉक्‍टरांना. डोळ्यांनी दिसताच सर्वांत आधी आईला बघितले...' हा प्रसंग श्रेयाने सांगितला; त्या वेळी तिच्यावर उपचार करणारे "मेडिकल'चे डॉ. अशोक मदान यांचेही डोळे पाणावले.

जग सुंदर आहे. ते प्रत्येकाला पाहता यावे, यासाठी नेत्रदान करा. वर्षाकाठी 2 लाख नेत्रगोलांची गरज आहे. मात्र, अवघे 35 हजार नेत्रगोल गोळा झाले. मृत्यूनंतर पुरेशा प्रमाणात नेत्रदान झाले, तर राज्यातील 40 हजार चिमुकल्यांच्या जीवनातील अंधार सहज दूर करता येईल.
- डॉ. अशोक मदान, नेत्ररोगतज्ज्ञ, विभागप्रमुख, मेडिकल (नेत्ररोग विभाग) नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur vidarbha news global eye donation day