नागपुरात तीन आठवड्यांत घटले ५८ हजारांवर सक्रिय रुग्ण, आज एक हजार नव्या बाधितांची भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

नागपुरात तीन आठवड्यांत घटले ५८ हजारांवर सक्रिय रुग्ण, आज एक हजार नव्या बाधितांची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात सक्रिय रुग्णांचा आलेख सव्वादोन महिन्यानंतर सतरा हजारापर्यंत आला असून यंत्रणेवरील ताण किंचित कमी झाल्याचे चित्र आहे. गेल्या तीन आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५८ हजार ५५४ ने कमी झाली. सद्यःस्थितीत जिल्ह्यात १७०५४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, आज एक हजार नव्या बाधितांची (new corona positive) भर पडली. गेल्या २४ तासांत ३३ बळींची (corona death toll) नोंद झाली असून शहरातील ८ तर ग्रामीण भागातील १२ जणांचा यात समावेश आहे. १३ बळी जिल्ह्याबाहेरील आहेत. (1000 corona positive patients found today in nagpur)

हेही वाचा: कोरोना नाही तर 'या' आजाराचं मेळघाटातील गावात थैमान

यापूर्वी १५ मार्चला जिल्ह्यात १७ हजार ५२९ सक्रिय रुग्ण होते. त्यानंतर सातत्याने यात वाढ होत गेली होती. एक मे रोजी सर्वाधिक ७५ हजार ६०८ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सक्रिय रुग्णांचा आलेख खाली येत आहे. काल पहिल्यांदाच ही संख्या २० हजारांच्या खाली आली. आज जिल्ह्यात १७ हजार ५४ सक्रिय रुग्ण आहेत. सव्वादोन महिन्यानंतर ही आकडेवारी १७ हजारापर्यंत आली. दरम्यान, जिल्ह्यात आज एक हजार बाधितांची नोंद करण्यात आली. शहरातील बाधितांच्या संख्येतही घट होत आहे. आज अनेक महिन्यानंतर प्रथमच शहरातील बाधितांची संख्या चारशेपर्यंत आली. शहरात ४११ बाधितांची नोंद करण्यात आली असून ग्रामीणमध्ये ५७६ बाधितांची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६८ हजार ९३१ जण कोरोनाने बाधित झाले. गेल्या २४ तासांमध्ये ३३ मृत्यूची नोंद करण्यात आली असून यात जिल्ह्याबाहेरील कोरोनाबळींची संख्या सर्वाधिक १३ आहे. शहरात ८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ग्रामीणमध्ये १२ जण बळी ठरले. या बळींसह जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या ८ हजार ७१८ पर्यंत पोहोचली. यात शहरातील ५ हजार १७९ तर ग्रामीणमधील २ हजार २३२ जणांचा समावेश आहे.

३ हजारावर कोरोनामुक्त

दररोज कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज जिल्ह्यात ३ हजार १५९ बाधित कोरोनातून मुक्त झाले. याशिवाय घरीच उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचा यात समावेश नाही. त्यामुळे ही संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. शहरात १ हजार ३६२ तर ग्रामीण भागात १ हजार ७९७ जण कोरोनातून बरे झाले. आतापर्यंत ४ लाख ४३ हजार १५९ जण कोरोनातून मुक्त झाले.

loading image
go to top