चंद्रपूरच्या इतिहासात नव्यानं भर; खोदकाम करताना सापडली बाराव्या शतकातील श्रीकृष्णाची मूर्ती! Chandrapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lord Krishna Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अश्मयुगाच्या खाणाखुणा चंद्रपुरात (Chandrapur) सापडतात.

Chandrapur : चंद्रपूरच्या इतिहासात नव्यानं भर; खोदकाम करताना सापडली बाराव्या शतकातील श्रीकृष्णाची मूर्ती!

चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूरमधून इतिहासाबाबत महत्वपूर्ण बातमी समोर आलीये. इथं शौचालय बांधकामासाठी खड्डा खोदणं सुरू होतं. सात ते आठ फूट खोल खड्डा खोदून झाला होता. अन् खोदत असतानाच काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

कारण, तो केवळ दगडच नव्हता तर श्रीकृष्णाचं (Shri Krishna) सुरेख शिल्प होतं. शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. मूर्तीला दुग्धभिषेक करत हात जोडले. चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अश्मयुगाच्या खाणाखुणा चंद्रपुरात (Chandrapur) सापडतात.

खड्डा खोदताना काळा दगड लागला अन्..

राष्ट्रकूट, चालुक्य, मौर्य, सातवाहन, नाग, परमार, भोसले यांची राजवट चंद्रपूर जिल्ह्यात होती. इतिहासाची साक्ष देत अनेक देखण्या वास्तू आजही जिल्ह्यात उभ्या आहेत. आता नव्यानं चंद्रपूरच्या इतिहासात भर पडलीये. कारण, चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर हे घराच्या कामासाठी खोदकाम करत होते. शौचालयाच्या बांधकामासाठी खड्डा खोदत असताना त्यांना एक काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.

कारण, तो केवळ दगडच नव्हता तर श्रीकृष्णाचं सुरेख शिल्प होतं. हे शिल्प सापडल्याची बातमी परिसरात पसरताच इथं गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. यावेळी या मूर्तीला दुग्धभिषेक करण्यात आला. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून ती चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासकांच म्हणणं आहे.

श्रीकृष्णाचं शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना

श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. सापडलेलं शिल्प दक्षिणात्य शैलीतील आहे. हे शिल्प काळ्या दगडावर कोरलेलं आहे. श्रीकृष्णाचा डोक्यावर करंडक मुकुट असून हातात बासरी आहे. दोन्ही बाजूला दक्षिणात्य शैलीतील मंदिर कोरलेलं आहे.