आश्रम शाळेतील १६ विद्यार्थ्यांना अन्नातून बाधा, ३ विद्यार्थ्यांनीची प्रकृती गंभीर

16 student got poisons in ashram school mangrude in nagpur
16 student got poisons in ashram school mangrude in nagpur

उमरेड (जि. नागपूर) : येथून जवळच असलेल्या मांगरूडच्या अनुदानीत आदिवासी आश्रम शाळेतील १६ विद्यार्थ्यांना अन्नातून बाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी तीन विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

शहरापासून ७-८ किमी अंतरावर असलेले मांगरुड हे भिवापूर तालुका अंतर्गत येते. याठिकाणी अनुदानित आदिवासी मुलांची आश्रमशाळा आहे. यामध्ये वर्ग पहिली ते दहावीच्या वर्गात साधारण १५० विद्यार्थी घेतात. रविवारी (ता. १४) या शाळेतील १६ मुलींना डोकेदुखी, पोटदुखी, हगवण, उलटी आणि मळमळ ही लक्षणे जाणवू लागली. यामध्ये ४ मुले, तर १२ मुली असून त्यांना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शाळेचे मुख्याध्यापक कातोरे आणि वसतिगृह अधिक्षक ललिता जोधे यांनी खासगी वाहनातून उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हे सर्व विद्यार्थी बारा ते पंधरा वर्षे वयोगटातील असून त्यापैकी १३ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून प्रकृती ठीक असल्यामुळे सुट्टी देण्यात आली, तर उर्वरित तीन विद्यार्थिनींना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. यामध्ये संजीवनी संदीप गेडाम(१५), सुषमा कमलसिंग धुर्वे (११) आणि मेहक गेंदलाल परतेकी (१६)या तिघींचा समावेश आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा आमदार राजू पारवे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. त्यावेळी त्या बाधित विद्यार्थ्यांच्याजवळ आश्रमशाळेतील महिला शिपाई (स्वयंपाक करणारी बाई) व्यतिरिक्त अन्य जबाबदार शिक्षक किंवा अधिकारी यापैकी कुणीच आढळून आले नाही. त्यामुळे ते चांगलेच संतापले होते. त्यांनी संबंधित शिक्षक व अन्य अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघाडणी केली.

सदर विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेली नसून त्यांना अपचन झाले होते. कारण शनिवारी रात्रीच्या जेवणात अंडाकरी देण्यात आली. त्यानंतर रविवारी सकाळी कांदेपोहे आणि त्यानंतर दुपारचे जेवण. शाळेत एकूण १५० विद्यार्थी आहेत. विषबाधा असती तर सर्वांना झाली असती. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान प्रकृतीत बिघाड आल्याने मुलांना आम्ही उमरेड च्या ग्रामीण रुग्णालयात भरती केले. तेव्हापासून रात्री ८ वाजेपर्यंत मी स्वतः हजर होतो. मात्र, तीन मुलींना महिला वॉर्डात भरती ठेवण्यात आल्याने पुरुषाचे थांबणे योग्य वाटले नाही. त्यामुळे शाळेच्या स्वयंपाकीन बाईस ठेवून आम्ही सतत संपर्कात होतो.त्या तिघींची प्रकृती स्थिर आहे.
- काशिनाथ किसन कातोरे, मुख्याध्यापक, आश्रम शाळा, मांगरूड

सदर प्रकार लक्षात घेता मी व पंचायत समितीच्या वतीने आलेले मिलिंद निवृत्ती मेश्राम आम्ही दोघांनी शाळेतील पिण्याचे पाणी व स्वयंपाक खोलीसोबतच तेथील अन्नधान्य, भाजीपाला, भांडी यांची पाहणी केली असता विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असे स्पष्ट होत नाही. मात्र, घटनेच्या पूर्वसंध्येला जेवणात दिलेली अंडाकरी, सकाळ च्या न्याहारीत खाल्लेले कांदेपोहे आणि काही वेळातच दुपारचे भरपेट जेवण त्यामुळे अपचन झाले आणि मळमळ, पोटदुखी, अतिसार हा सर्व प्रकार झाला असावा.
- डॉ मडकवार, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, नांद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com