esakal | पोलिसाच्या घराला आग लावणारे सीसीटीव्हीतील ते दोघे कोण? कुटुंबीयांनाही मारण्याचा केला प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पोलिसाच्या घराला आग लावणारे CCTVतील ते दोघे कोण? कुटुंबीयांनाही मारण्याचा केला प्रयत्न

sakal_logo
By
अनिल कांबळे @anilkambleSakal

नागपूर ः पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि दोन मुलांना घरात कोंडून घरावर रॉकेल ओतून पेटवून देत जीवे मारण्याच्‍या प्रयत्न केल्याच्या घटनेत अद्याप पोलिसांना कोणताही धागा गवसला नाही. त्यामुळे ही घटना घडण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या प्रकरणी दोन व्यक्तीवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण हे नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत असून ते वानाडोंगरीतील आयटीआय कोव्हिड सेंटरला तैनात आहेत. ते एसआरपीएफ कॅम्पजवळील ज्ञानदीप कॉलनीलगतच्या सप्तकनगर पत्नी पूनम, मुलगा राघव (६) आणि केशव (३) यांच्यासह राहतात. मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात दोन आरोपींनी राहुल यांच्या घरावर रॉकेल ओतले आणि आग लावली. त्यावेळी घरात राहुलची पत्नी पूनम आणि दोन्ही मुले होते.

घरात धूर दाटल्यामुळे पूनम या झोपेतून जागा झाल्या. त्यांनी समयसूचकता दाखवत दोन्ही मुलांना बेडरूममधून काढून किचनमध्ये आणले. मामाला फोन करून स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न केला. मामाने दार तोडून तिघांनाही बाहेर काढले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. शेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज जप्त केले. दोन आरोपी घराच्या दरवाज्यातून रॉकेल ओतून आग लावताना दिसत आहेत. त्या दोघांची ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहेत.

भांडणातून वचपा काढण्याचा प्रयत्न

राहुलचे पहिल्या पत्नीसोबत नेहमी खटके उडत होते. वादावादीतून राहुलने पहिल्या पत्नीपासून २०११ मध्ये घटस्फोट घेतला होता. त्याही दिशेने पोलिस तपास करीत आहेत. तसेच राहुल भांडखोर स्वभावाचा असल्यामुळे त्याचा अनेकांशी वाद झाला आहे. त्यामुळे कुणी भांडणातून वचपा काढण्याचा प्रयत्न केला का? याचाही तपास पोलिस करीत आहेत. पूनम यांनी ३-४ संशयितांची नावे सांगितली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ