esakal | ...तर लसीकरणाला लागतील पाच वर्षे! २१ लाख ५० हजार नागरिक अजूनही वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

...तर लसीकरणाला लागतील पाच वर्षे! २१ लाख ५० हजार नागरिक अजूनही वंचित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लसीकरणात (vaccination) पुणे, मुंबईनंतर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नागपूर शहरात गेल्या पंधरवड्यात केवळ सहा दिवस लसीकरण झाले. लसीकरणाचा (nagpur vaccination drive) हाच वेग कायम राहिल्यास आणि शहराची लोकसंख्या पाहता उर्वरित नागरिकांच्या लसीकरणास आणखी पाच वर्षे लागू शकतात. (21 lakh 50 thousand people still waiting for vaccine in nagpur)

हेही वाचा: नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी

शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले अन् लसीचा तुटवडा सुरू झाला. लसीच्या तुटवड्यामुळे राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू केले. शहरात १९ जूनला या वयोगटासाठी तर २३ जूनपासून १८ ते २९ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले. २३ व २४ जूनला सलग लसीकरणानंतर २५ जून ते आज ९ जुलै, या पंधरवड्यात केवळ सहा दिवस लसीकरण झाले. यात १ लाख ३४ हजार नागरिकांनी लस घेतली. यात १८ ते ४४ वयोगटाचाही समावेश आहे. लसीकरणाचा हा वेग मार्च, एप्रिलच्या तुलनेत अत्यंत मंद असल्याचे दिसून येत आहे. मार्च, एप्रिलमध्ये १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण नसतानाही दररोज अकरा ते बारा हजार नागरिकांचे लसीकरण झाले. अर्थात पंधरा दिवसांत दीड लाखांवर नागरिकांचे लसीकरण पार पडले. परंतु गेल्या पंधरवड्यात केवळ सहा दिवस लस उपलब्ध झाली. त्यामुळे लसीकरणाचा वेग चांगलाच मंदावला. शहराची लोकसंख्या ३० लाख असून यात २० टक्के ० ते १८ वयोगटातील मुलांचा, तरुणांचा समावेश आहे. शहरातील ८० टक्के अर्थात २४ लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहे. गेल्या सहा महिन्यांत ९ जुलैपर्यंत २ लाख ६१ हजार ९८३ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले. अजूनही २१ लाख ५० हजार नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे. याच मंदगतीने लसीकरण सुरू राहिल्यास २१ लाख ५० हजार नागरिकांच्या लसीकरणाला जवळपास ५६ ते ५७ महिने, अर्थात पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सव्वासात लाख नागरिकांचा दुसरा डोस शिल्लक -

शहरातील ७ लाख २६ हजार ४५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. लस उपलब्ध नसल्याने यातील हजारो नागरिकांच्या दुसऱ्या डोसची तारीख निघून गेली. अनेकदा केंद्रावर लस संपल्याने त्यांना घरी परत जावे लागले.

महापालिका केंद्रांत आजही लस नाही -

कोविशिल्ड लसीचा पुरवठा उपलब्ध न झाल्याने उद्या, शनिवारी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. मेडिकल, महाल रोग निदान केंद्रात कोवॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे.

loading image