esakal | ३५४ नागरिक किरकोळ जखमी तर दोघे जखमी, ते असे का उठतात एकमेकांच्या जिवांवर? वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

पांढुर्णाः प्रशासनाचा आदेश धुडकावून सुरु करण्यात आलेली गोटमार.

 येथे एकमेकांची विनाकारण डोकी फोडली जातात. तशी गावाची परंपरा आहे बरं का ! शेजारी एक छोटेसे गाव. दोन्ही गावाच्या मधून नदी वाहते. तसे दोन्ही गावचे नागरिक वर्षभर एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदतात. लहानमोठे सगळेच वर्षभर तान्हया पोळ्यानिमित्त डोके फोडण्याची उत्सुकतेने वाट पाहात असतात. असे काय होते या दिवशी की ते एकमेकांच्या जिवावर उठतात....

३५४ नागरिक किरकोळ जखमी तर दोघे जखमी, ते असे का उठतात एकमेकांच्या जिवांवर? वाचा...

sakal_logo
By
अतुल दंढारे

मेंढला (जि.नागपूर) : मध्यप्रदेशातील पांढुर्णा हे भारताच्या नकाशावरील बहुचर्चित गाव. बहुचर्चित एवढ्यासाठीच की येथे एकमेकांची विनाकारण डोकी फोडली जातात. तशी गावाची परंपरा आहे बरं का ! शेजारी एक छोटेसे गाव. दोन्ही गावाच्या मधून नदी वाहते. तसे दोन्ही गावचे नागरिक वर्षभर एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदतात. लहानमोठे सगळेच वर्षभर तान्हया पोळ्यानिमित्त डोके फोडण्याची उत्सुकतेने वाट पाहात असतात. असे काय होते या दिवशी की ते एकमेकांच्या जिवावर उठतात. वाचा...

अधिक वाचाः नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

प्रशासनाचा आदेशही धुडकावला
येथे दरवर्षीची तान्हया पोळ्याच्या दिवशी गोटमारीची अनेक वर्षापासून प्रथा आहे. या गोटमारीत आतापर्यंत अनेकांची डोकी फुटली आहेत.कुणाला अपंगत्व आले आहे. काहींना जीवही गमवावा लागला आहे. ही प्रथा बंद करण्याचे शासनप्रशासनाचे प्रयत्न झालेत. परंतू सगळे निष्फळ ठरले. या जिवघेण्या प्रथेचे तसे समर्थन व्हायला नको. परंतू काहीही केले तरी या प्रथेला कुणाला बंद करता आले नाही. यावर्षी कोरोनामुळे होणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर प्रशासनाचे आदेश धुळकावून अखेर झालीच. या गोटमारीत ३५४ नागरिक किरकोळ तर दोघे गंभीर जखमी झाले.

अधिक वाचाः फक्त वचन द्या मालक, मी कत्तलखान्यात मरणार नाही…

यंदा मतभेद ठरले हाणामारीचे कारण
बुधवारी पांढुर्णा येथील प्रसिद्ध गोटमार सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरू झाली. सकाळी सातच्या सुमारास सावरगाव येथील कावळे कुटुंबीयांनी जाम नदीच्या पुलावर मध्यभागी झेंडा रोवला. १० वाजेपर्यंत नागरिकांनी झेंड्याची पूजा केली. मात्र गोटमार समितीसह शांतता समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार दोन्ही पक्षांच्या सहमतीने सकाळी १० वाजता तो झेंडा पांढुर्णावासींच्या स्वाधीन करून मॉ चंडिकेच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवण्याचे निश्चित झाले होते. दरम्यान सावरगाव पक्ष आणि पांढुर्णा पक्षाच्या सहमतीने  झेंडा नेण्याचे एकदाचे ठरल्यानंतर पुन्हा त्यांच्यात मतभेद झाले. सकाळी अकराच्या सुमारास गोटमारीला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी ६.३०च्या दरम्यान गोटमार थांबविण्यात येऊन आपसी सहमतीने तो झेंडा पांढुर्णावासींनी मॉ चंडिका देवीच्या मंदिरात नेऊन ठेवल्यानंतर या गोटमारीचा समारोप करण्यात आला. सावरगाव आणि पांढुर्णा येथे नागरिकांमध्ये तुफानी गोटमार सुरु झाल्याचे चित्र दिवसभर दिसून आले. यामध्ये ३५४ नागरिक किरकोळ जखमी तर दोघे गंभीर जखमी झाले.

अखेर पोलिस बंदोबस्तही हटविला
 यावर्षी बाहेर गावांतून तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्यांना बंदी असल्यामुळे  पांढुर्णा शहरात कोणालाच दाखल होता आले नाही. त्यामुळे पाहणाऱ्यांचे प्रमाण फार कमी होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पांढुर्णा शहरामध्ये प्रशासनाकडून जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला होता. दरम्यान संपूर्ण बाजारपेठ बंद होती. मात्र नागरिकांनी घराघरातून बाहेर निघून गोटमारस्थळी हजेरी लावल्याचे दिसून आले. पाहता-पाहता नागरिकांची गर्दी वाढत गेली. गर्दी पाहून गोटमार खेळणाऱ्यांना प्रोत्साहन मिळाल्याने दिवसभर तुफान गोटमार सुरु होती. दोन्ही पक्षाचे नागरिक एकमेकांवर दगडफेक करीत होते. सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास पांढुर्णा शहरातील जवाहर वाचनालयावर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने काही प्रमाणात वाचनालयाचे नुकसान झाले. या दगडफेकीत कर्तव्यावर तैनात असलेले पोलिस कर्मचारी मात्र थोडक्यात बचावले. नंतर तेथून पोलिस बंदोबस्त हटविण्यात आला. परिस्थितीचा आढावा घेत अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक शशांक आनंद यांनी त्वरित पांढुर्णा येथील समाजभवन येथूनही पोलिस बंदोबस्त हटविला होता.

अधिक वाचाः अरे व्वा! पोलिसांची तर मज्जाच मज्जा...वाचा सविस्तर

जमा केलेले दगडही वापरले जातात
पांढुर्णा येथील नागरिक नेहमीच झेंडा तोडण्याचा प्रयत्न करतात आणि सावरगाव येथील नागरिक त्या झेंड्याचे रक्षण करतात. यावर्षी जाम नदीमध्ये दगडांची कमतरता दिसून आली. दरम्यान काही नागरिकांनी घरातील पोत्यांमध्ये जमा करुन ठेवलेले दगड घेवून गोटमारस्थळी पोहचले होते. काही नागरिक नदीतील दगडांनी गोटमार खेळत होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोटमारीला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी ६.३0 वाजता गोटमार थांबविण्यात येवून आपसी सहमतीने तो झेंडा पांढुर्णावासींनी मॉ चंडिका देवीच्या मंदिरात नेवून ठेवल्यानंतर या गोटमारीचा समारोप करण्यात आला.

संपादन  : विजयकुमार राऊत

loading image
go to top