esakal | भय इथले संपत नाही! आज ६५ मृत्यू, ६८२६ नवे कोरोनाबाधित

बोलून बातमी शोधा

file image
भय इथले संपत नाही! आज ६५ मृत्यू, ६८२६ नवे कोरोनाबाधित
sakal_logo
By
केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : समुह संसर्गाच्या शिखरावर जात असलेल्या कोरोना अधिक वेगाने वाढत आहे. कोरोना विषाणूने पुन्हा उसंडी घेतली असून आज दिवसभरात ६ हजार ८२६ नव्या रुग्णांची विक्रमी साखळी जोडली. रोज नव नव्या उच्चांकाने वाढत असलेल्या या प्रादुर्भावाने आता खाटाच नसल्याने उपचार करणार कोठे आणि इतके मनुष्यबळ आणणार कुठून अशी विचित्र कोंडी आरोग्य यंत्रणेपुढे निर्माण केली आहे. त्यातच मृत्यूचे संकट अधिक गहरे होत असून ६५ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला. तर सध्या जिल्ह्यात ६१ हजार ६२ कोरोनाबाधित जिल्ह्यात असल्याने अतिशय भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

ज्या वेगाने हा कोरोना विषाणू वाढत आहे, तो पाहता शहरातील सर्व सरकारी, खासगी रुग्णालये प्रशासनाने ताब्यात घेतली तरी खाटा शिल्लक राहितील, की नाही अशीही भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूने दस्तक दिल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ४३ जणांना विळखा घातला आहे. त्यापैकी आज ३ हजार ५१८ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत २ लाख २४ हजार ७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या या घडामोडीत जीवाला आणखी घोर लावणारी बाब म्हणजे मृत्यूचा टक्का वाढला आहे. दिवसभरात झालेल्या ६५ मृत्यूंमध्ये शहरातील ३६ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २२ जणांसह जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्या झालेल्या मृत्यूंची संख्या ५ हजार ९०३ झाली आहे.

हेही वाचा - अमरावतीत कोरोनाचा ग्राफ वाढताच; आज 522 नवे रुग्ण

चाचण्यांचा उच्चांक

मंगळवारी (ता.१३) दिवसभरात जिल्ह्यातून २९ हजार १२२ संशयितांच्या कोरोना चाचण्या झाल्या. हा आतापर्यंतच्यया चाचण्यांतील उच्चांक आहे. त्यापैकी ६ हजार ८२६ जणांचा अहवाल कोरोना बाधित आढळला आहे. यात महापालिका हद्दीतील ४ हजार ६७५ तर २ हजार १४४ जण ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्याबाहेरील ७जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १८लाख ७३ हजार ४१३ चाचण्या झाल्या आहेत. यातील साडेतेरा लाखावर चाचण्या शहरातील आहेत, तर पाच लाखावर चाचण्या या ग्रामीण भागातील आहेत.

४६ हजार कोरोनाबाधित गृहविलगीकरणात -

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवरून ७६.९९ टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. आज घडिला जिल्ह्यात ६१ हजार ६२ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यापैकी ४६ हजार ८१८ कोरोनाबाधितांना लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले १४ हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ७ हजार ३१८ कोरोनाबाधितांवर मेयो, मेडिकल, एम्स, अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह नागपुरातील इतर शासकीय व खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये उपचार घेत आहेत.

  • मेडिकलमधील मृत्यू - २ हजार ५३२

  • मेडिकलमधील मृत्यू -२ हजार ०२०

  • एम्समधील मृत्यू - ५५

  • खासगीतील मृत्यू - १ हजार ४००