
Waste Management : अबब ! एका घरातून सरासरी एक लाख टन कचरा
नागपूर : गेल्या तीन वर्षांत शहरातील साडेसहा लाख घरातून तब्बल ८ लाख टन गोळा करण्यात आला. घरांची संख्या लक्षात घेता प्रत्येक घरातून सरासरी एक लाख टनापेक्षा जास्त कचरा निघाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. विशेष म्हणजे यात चार लाख टन मातीचा समावेश असल्याने शहराच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात धुलीकण असल्याचेही स्पष्ट होत आहे.
शहरात दररोज घराघरातून कचरा गोळा केला जातो. याशिवाय घरपाडकामातील मलबा, खोदकामातील कचरा, लोखंड, प्लास्टिक, जुते, चप्पल, काच, टायरचाही कचरा भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये टाकला जात आहे. २०१९ पासून या कचऱ्यावर बायोमाईनिंग प्रक्रिया केली जात असल्याने डम्पिंग यार्डमधील कचऱ्याचे ढिगारे कमी झाले आहेत.
झिग्मा या कंपनीकडे बायोमाईनिंग प्रक्रियेची जबाबदारी आहे. स्मार्ट सिटी कंपनीनेही बायोमाईनिंगसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात बायोमाईनिंग प्रक्रियेला वेग येणार असून भांडेवाडीतील ढिगारे पूर्ण नाहिसे होण्याची शक्यता आहे.
झिग्मा या कंपनीच्या डाटानुसार २०२० ते २०२२ या तीन वर्षांत भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे ८ लाख २२ हजार ७७१ टन कचरा गोळा झाला. यात घरातून निघणाऱ्या कचऱ्या कचऱ्यासोबत खोदकामातील माती, घरबांधकामातील रेती-मातीचे ढिगारे, पाडकामातील विटा-रेती-गिट्टीचा मोठा समावेश आहे. विशेष म्हणजे ३ लाख ७९ टन मातीचा या कचऱ्यात समावेश आहे. त्यामुळे खोदकाम करणारे माती रस्त्यांवर जैसे थे ठेवत असून महापालिकेला त्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
एवढेच नव्हे ३ लाख ५९ टन पाडकामातील कचरा अर्थात तुटलेल्या विटा, कॉंक्रिट आदी भांडेवाडीत जमा करण्यात आले. त्यामुळे घर पाडताना झालेल्या कचऱ्याची जबाबदारीही महापालिकाच उचलत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील नागरिक प्लास्टिकमध्ये घरातील ओला, सुखा कचरा देतात. असा कचरा एकूण ८४ हजार टन आहे. याशिवाय प्लास्टिक, लोखंड, जोडे, चपला, टायर, लाकडे आदी कचऱ्याचा यात समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे शहर स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येत आहे.
तीन वर्षातील वेगवेगळा कचरा
एकूण कचरा - ८ लाख २२ हजार टन
माती ः ३ लाख ७९ हजार टन
विटा, रेती, गिट्टी ः ३ लाख ५९ हजार टन
प्लास्टिक थैलीतील घरगुती कचरा
८४ हजार टन
लोखंड ः १० टन
काच ः १८ टन
जोडे, चपला ः १६७ टन
टायर ः २१ टन
इतर ः ४२ टन