esakal | तिघांवर सारीच्या वॉर्डात सुरू होता उपचार, मात्र...
sakal

बोलून बातमी शोधा

Another thirty five patients found in Nagpur

तिन्ही रुग्ण सारीच्या वॉर्डात उपचार घेत होते. मात्र, कोरोनाची बाधा असल्याचे उघड होताच त्यांना कोरोना वॉर्डात दाखल केले. मात्र, या दरम्यान रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रशासनाने त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांची माहिती घेणे सुरू आहे. खबरदारी म्हणून विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

तिघांवर सारीच्या वॉर्डात सुरू होता उपचार, मात्र...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सतरंजीपुरा येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची प्रादुर्भाव साखळी वाढत असतानाच बुधवारी मध्यरात्री उशिरापर्यंत 68 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदानातून पुढे आले. गुरुवारी (ता. 7) आणखी 35 जणांना कोरोनाने विळख्यात घेतले. आता शहरातील आकडा 265 वर पोहोचला आहे. त्यातच सारीच्या आजारासाठी भरती झालेल्या तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून पुढे आले आहे. 

पार्वतीनगरात 22 वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने या भागातील नागरिक दहशतीत आहेत. गेले दोन महिने दक्षिण नागपूर सुरक्षित असताना अचानक बुधवारी मृताच्या संपर्कात आलेल्या 168 जणांना संशयित म्हणून विलगीकरणात पोहोचविण्यात आले. विशेष असे की, पार्वतीनगर व रामेश्‍वरी भागातील विलगीकरणातील नागरिकांच्या घशातील द्रवाचे नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. गुरुवारी निदानातून आलेल्या बाधितांमध्ये सतरंजीपुरा, मोमिनपुरा, शांतीनगर परिसरातील नागरिकांचा समावेश आहे.

क्लिक करा - गुंड प्रवृत्तीच्या युवकाचा असाही झाला शेवट...

उपराजधानीत आतापर्यंत साडेचार हजारांवर कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मेडिकलमध्ये उपचारासाठी भरती असलेल्या "सारी'च्या तीन रुग्णांनाही कोरोनाची बाधा असल्याचे गुरुवारी पुढे आले. हे तिन्ही रुग्ण सारीच्या वॉर्डात उपचार घेत होते. मात्र, कोरोनाची बाधा असल्याचे उघड होताच त्यांना कोरोना वॉर्डात दाखल केले. मात्र, या दरम्यान रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रशासनाने त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांची माहिती घेणे सुरू आहे. खबरदारी म्हणून विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

24 तासांत मोमिनपुऱ्यातील 66 जण बाधित

उपराजधानीत दोन दिवसांमध्ये शंभरपेक्षा अधिक नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. यात प्रामुख्याने मोमिनपुऱ्यातील 76 कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे सतरंजीपुऱ्यानंतर मोमिनपुरा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. त्यातच पार्वतीनगरातील मृताच्या संपर्कातील आणखी 80 जणांना गुरुवारी विलगीकरणात घेण्यात आले. यांच्या नमुन्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे. यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. गुरुवारी बाधितांमध्ये सतरंजीपुरा, मोमिनपुरा, ताजबाग, जरीपटका येथील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मेयो-मेडिकलमध्ये 195

मेडिकलच्या कोरोना वॉर्डसहित इतर कोरोना वॉर्ड तसेच मेयोतील कोरोना वॉर्डात आतापर्यंत 255 जणांना दाखल करण्यात आले. यातील 66 बरे झाले. तर तिघे कोरोनामुळे दगावले. सध्या मेयो-मेडिकलमध्ये सुमारे 193 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. काही बाधितांचा अहवाल उशिरा आल्याने त्यांना मेयो-मेडिकलमध्ये उपचारासाठी आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सविस्तर वाचा -  प्रसूतीपूर्वी केलेल्या चाचणीत अहवाल आला निगेटिव्ह... चिमुकला जन्मतःच रडला अन्‌ डॉक्‍टर म्हणा

नागपूरच्या एम्सने तपासले मालेगावचे नमुने

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करतानाच नमुने तपासणीला मर्यादा आल्या आहेत. मात्र, मालेगाव येथून नमुने तपासणीसाठी नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)मध्ये पाठवण्यात आले. एम्सच्या संचालक डॉ. विभा दत्ता, कोरोना समन्वयक डॉ. मनीष श्रीगिरीवार आणि प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. मीना मिश्रा (वाजपेयी) यांनीही दुपारी आलेले हे नमुने तातडीने संध्याकाळपर्यंत येथील प्रयोगशाळेत तपासले आणि त्याचा अहवाल सादर केला. 

कोरोनाची आकडेवारी

 • दैनिक संशयित : 215 
 • एकूण संशयित : 2636 
 • सध्या भरती संशयित : 124 
 • एकूण भरती संशयित : 1713 
 • एकूण भरती कोरोनाबाधित रुग्ण ः 195 
 • दैनिक तपासणी नमुने : 180 
 • एकूण तपासणी नमुने: 4275 
 • आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने: 265 
 • घरी सोडलेले सकारात्मक रुग्ण : 66 
 • घरी सोडलेले संशयित : 1586 
 • आज विलगीकरण केलेले संशयित: 168 
 • विलगीकरण कक्षात भरती संशयित ः 2089 
 • विलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले संशयित ः 23 
 • पाठपुरावा सुरू असलेले एकूण संशयित ः 423