esakal | देशातील विद्यापीठामध्ये हिंदुत्व विरोधी शिकवण : शांतक्का | Nagpur
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

देशातील विद्यापीठामध्ये हिंदुत्व विरोधी शिकवण : शांतक्का

sakal_logo
By
केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या या काळामध्ये भारतीय ‘स्त्री’ने आपले कुटुंब संकटात असूनदेखील इतरांची मदत केली. हा भारतीयांचा स्वभाव आहे. भारतीय समाजामध्ये सर्व समावेशक भाव आहे. जगातील अनेक देशांनी भारतीयांचे हे गुण अंगीकारले आहेत. मात्र, तरी देखील काही वामपंथी लोक हिंदुत्वाचा विरोध करीत आहे. देशातील विद्यापीठामध्ये हिंदुत्व विरोधी शिकवण दिली जाते आहे, अशी खंत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांतक्का यांनी व्यक्त केली.

राष्ट्र सेविका समिती नागपूर विभागाचा विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून पर्यावरण अभ्यासक, वास्तु विशारद शेफाली दुधबडे उपस्थित होत्या. तर, मंचावर प्रांत कार्यवाहिका रोहीणी आठवले, करुणा साठे उपस्थित होत्या. शांतक्का म्हणाल्या, आंबेडकर किंग्ज स्टडी सर्कल या विषयी सेमिनार आयोजित करीत आहे. याला विरोध करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे.

यामुळे, हिंदुत्वाबाबत तरुणांचे मन विचलीत होते आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पशू, पक्षी, प्राणी या सर्वांचे रक्षण करण्याची शिकवण दिली जाते. हे पुरातन काळापासून चालत आले आहे. यालाच आपण हिंदू संस्कृती म्हणतो. भारतीय स्त्री ही पूर्ण परिवार, परिवार ते पूर्ण समाज आणि समाजापासून राष्ट्रापर्यंतचा विचार करते.

शेफाली दुधबडे म्हणाल्या, सामाजिक जडणघडणीमध्ये स्त्रिया आपले अस्तित्व विसरल्या आहेत. स्त्रियांनी आपल्याला रुची असलेल्या विषयामध्ये एक तरी संकल्प घेतला पाहिजे. यासोबतच पर्यावरणाच्या हिताचा देखील संकल्प ‘स्त्री’ने करायला हवा. महिला कुशलतेने कार्य करू शकतात. पुढील पिढीच्या हिताच्या दृष्टीने कचरा व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

याची सुरवात आपल्याला आपल्या पासूनच करायची आहे. कचऱ्याचे योग्य प्रकारे विभाजन न केल्या गेल्यास हा मिश्रित कचरा अत्यंत घातक ठरू शकतो. याआधी यादृष्टीने अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला यश आले नाही. यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीने महिलांनी संकल्प करीत इतरांनाही प्रेरित केले पाहिजे.

loading image
go to top