esakal | घरीच केले मुलावर यशस्वी उपचार; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अर्जुनची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

घरीच यशस्वी उपचार; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अर्जुनची कोरोनावर मात

घरीच यशस्वी उपचार; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अर्जुनची कोरोनावर मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाची (Corona) लागण मोठ्यांना झाली तर चिंतेची बाब नसते. मात्र, एखाद्या घरातील अकरा वर्षांचे मूलच या आजाराच्या कचाट्यात सापडले, तर साहजिकच साऱ्यांच्याच उरात धडकी भरते. मात्र, बरडे परिवाराने (Barde family) घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार (Doctor's advice) घरीच योग्य उपचार करून मुलाला कोरोनामुक्त केले. (Arjun overcame Corona on the advice of a doctor)लसीकरणात संसर्गाचे सावट; चाचणी व लसीकरण एकाच ठिकाणी

हेही वाचा: लसीकरणात संसर्गाचे सावट; चाचणी व लसीकरण एकाच ठिकाणी

अंबाझरी ले-आऊटमध्ये राहणारे शेखर बरडे यांच्या परिवाराला नुकताच हा अनुभव आला. लॉकडाउनमुळे बरडे परिवारातील सर्वच सदस्य सध्या घरीच आहेत. बाहेर जाणे जवळपास बंदच आहे. त्याउपरही त्यांचा अकरा वर्षीय मुलगा अर्जुनला कोरोनाची बाधा झाली. अर्जुनला ताप आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी ओळखीच्या डॉक्टरकडे नेले. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आरटीपीसीआर चाचणीत काही गडबड तर नाही ना, अशी शंका त्यांच्या मनात येऊ लागली. मात्र, कोरोनाच असल्याचे सिद्ध झाल्यानंतर कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेत उपचार सुरू केले.

तो पंधरा दिवसांचा काळ आम्हा सर्वांसाठीच खूप कठीण राहिल्याचे वडील शेखर यांनी सांगितले. अर्जुन कोरोनामुक्त झाल्याने बरडे परिवारानेही सुटकेचा निःश्वास टाकला. ते म्हणाले, कोरोनासारखा आजार कुणालाही होऊ शकतो. मात्र, लहान मुलांना लागण झाल्यास आई-वडिलांनी भूमिका फार मोठी असते. त्यामुळे पालकांचे समुपदेशन होणे खूप गरजेचे आहे. विनाकारण भीती मनात ठेवल्यास घातकही ठरू शकते.

‘माध्यमांमुळेच भीतीचे वातावरण'

शेखर बरडे यांनी समाजात भीतीचे वातावरण पसरवत असल्याबद्दल विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला दोष दिला. ते म्हणाले, कोरोनामुळे आधीच सगळीकडे भीती व धास्तीचे वातावरण आहे. लोकं ‘पॅनिक’ होऊ नये, यासाठी सकारात्मक व उपाय सांगणाऱ्या बातम्या देणे खूप आवश्यक आहे. अशावेळी दै. ‘सकाळ'ने सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचा जो उपक्रम सुरू केला, तो निश्चितच कौतुकास्पद आहे.

असे केले उपाय

सर्वप्रथम अर्जुनला एका खोलीत इतरांपासून वेगळे केले. तसेच त्याला काही काळासाठी व्हिडिओ गेम्स व टीव्हीमध्ये बिझी ठेवून 'टेंशन' कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी डॉक्टरांनी सुचविलेले औषध नियमितपणे दिले. सुदैवाने अर्जुनने झपाट्याने उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दोन आठवड्यांतच तो ठणठणीत बरा झाला.

(arjun overcame Corona on the advice of a doctor)