esakal | परोपकाराचे भांडवल करण्यात रस नाही, दाभाडकरांच्या मुलीची भावना, तर सोशल मीडियावर तर्क-वितर्क

बोलून बातमी शोधा

asavari kothiwan
परोपकाराचे भांडवल करण्यात रस नाही, दाभाडकरांच्या मुलीची भावना, तर सोशल मीडियावर तर्क-वितर्क
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : माझ्या वडिलांनी रुग्णालयातील खाट रिकामी करून परोपकार केले. त्याच मोल आमच्यासाठी खूप मोठ आहे. असा परोपकार कोणी करणे शक्य नाही. त्यांनी केलेला त्याग आमच्यासाठी आदर्श आहे. केलेल्या परोपकाराचा उहापोह त्यांनी केला नाही. ती खाट कुणाला दिली, बाहेर कोण रडत होत याची त्यांना काहीही माहिती नाही. आम्हाला त्या परोपकाराचे भांडवल करायचे नाही, अशा भावना नारायण दाभाडकर यांची मुलगी आसावरी कोठीवान यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा: "राहू द्या नं भाऊ.. वर्षभरापासून आम्ही अपमानच सहन करतोय"; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्यांना उपेक्षेची वागणूक

नारायण दाभाडकर यांनी दाखविलेल्या माणुसकीची मंगळवारी सोशल मीडियावर चर्चा झाली. सकाळसह इतर माध्यमांनी या घटनेचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्यभर त्याची चर्चा रंगली. अनेकांनी आक्षेप घेत ही घटना खोटी असल्याचे ठामपणे म्हटले. तर, काही अतिउत्साही नेटकऱ्यांनी रुग्णालयाच्या कथित अधीक्षकांशी फोनवर चर्चा केल्याचा ऑडिओसुद्धा व्हायरल केला. दिवसभर घडलेल्या या कौतुक-टीका नाट्यावर आसावरी यांनी कुटुंबीयांतर्फे आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यभरातील व्हाट्सअ‌ॅप ग्रुपवर या घटनेच्या सत्यतेवर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. दाभाडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने ही घटना पेरली असल्याचा संशय डाव्या विचारसरणीच्या लोकांनी व्यक्त केला. मात्र, ही घटना सत्य असल्याचा दावा आसावरी कोठीवान यांनी केला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.