
पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार
नागपूर : आपण अविवाहित असल्याचे सांगून लग्न करण्याचे आमिष दाखवत युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकाजवळ लॉजवर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, प्रियकर विवाहित असल्याचे तिला कळले. तिने पोलिसात बलात्काराची तक्रार केली. पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. रूपेश लक्ष्मण लांडगे (३८, रा. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश लांडगे हा दिल्ली येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात शासकीय कर्मचारी आहे. १ जानेवारी २०१५ मध्ये एसटी प्रवासादरम्यान ३२ वर्षीय युवती आणि आरोपीची गणेशपेठ बस स्थानकावर ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले आणि चॅटिंग सुरू झाले. त्यांच्यात मैत्री वाढत गेली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यावेळी युवती खासगी कार्यालयात नोकरी करीत होती.
रूपेशशी मैत्री झाल्यानंतर त्याने तिला नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सांगितले. त्याच्या सांगण्यावरून तिने जॉब सोडला आणि पुण्यात जाऊन स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली. रूपेश विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. परंतु, ही बाब त्याने तिच्यापासून लपवून ठेवली. दोघेही पुण्यावरून नागपुरात आल्यानंतर त्याने गणेशपेठ बसस्थानकाजवळ असलेल्या लॉजमध्ये तिला नेले. लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार करायला लागला. पत्नी घरी नसल्याची संधी साधून पीडितेला घरी घेऊन गेला.
पुण्यात झाला उलगडा
युवती रूपेशला भेटायला पुण्यातील त्याच्या घरी गेली. मात्र, पत्नीसह असलेला फोटो तिला एका कोपऱ्यात झाकून ठेवलेला दिसला. तिने रूपेश बाहेर गेल्यानंतर हा फोटो बाहेर काढला. त्याचा पत्नीसह फोटो बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तो विवाहित असल्याचे तिच्या लक्षात आले. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाली. तिने थेट गोंदियाला पोहोचून पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गोंदिया पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेता आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. गणेशपेठ, बसस्थानक हे घटनास्थळ असल्याने हे प्रकरण गणेशपेठ पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.