esakal | पालकाच्या उपचारासाठी बनणार भंगारवाला
sakal

बोलून बातमी शोधा

पालकाच्या उपचारासाठी बनणार भंगारवाला

पालकाच्या उपचारासाठी बनणार भंगारवाला

sakal_logo
By
केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : भंगार वेचून कुटुंबाला पोसणारा पन्नाशी ओलांडलेला कर्ता पुरुष मेडिकलच्या खाटेवर पडून आहे. सोबतीला मुलगा. कसेबसे उपचार झाले. १४ दिवसानंतर सुटी झाली मात्र, शुल्क भरण्यासाठी हजार रुपये खिशात नसल्याने डॉक्टर सोडत नसल्याची मुलाची खंत. वडील कायमचे पंगू झालेले. मुलाने शुल्क माफीसाठी वैद्यकीय अधीक्षकांचे कार्यालय गाठले. शुल्क माफ झाले की नाही हे कळले नाही. मात्र, या तरुणाने आई-वडिलांवरील उपचारासाठी प्रसंगी शिक्षण सोडून भंगार वेचण्याची गाठ मनाशी बांधली आहे. गरिबीचे चटके सहन करणाऱ्या या युवकाचे नाव आहे अरविंद भाऊराव जाधव.

अरविंद जाधव मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील लोणी गावाचा. घरी आईवडील अशिक्षित. बंजारा समाज. दोन भाऊ, तीन बहिणी अशा संसाराचा गाढा वडील भाऊराव बंसी ‘भंगार’वाला बनून ओढत होते. एका भावाचे लग्न झाले. तो वेगळा झाला. एका बहिणीचे लग्न झाले. मात्र, तिचे लग्न मोडणार असल्याचे दुःख वडील सहन करू शकले नाही. भंगारची गाडी चालवत

शिक्षण सोडून तो बनणार भंगारवाला

असतानाच पक्षाघाताचा झटका आला. अंगाखांद्याला, हाताला काचा रुतल्या. शरीर रक्तबंबाळ झाले. नागपुरात मेडिकलमध्ये एक रुपया लागणार नाही, असे सांगत यवतमाळ मेडिकल कॉलेजने येथे रेफर केले. येथे डॉक्टरांनी उपचाराच्या वेळी हाताची बोटे कापली. हात कापण्याची तयार केली. रुग्णाला घेऊन जा असे सांगण्यात आले. सुटी घेऊन जाणार असल्याचे सांगताना शुल्क भरल्याशिवाय सोडणार नसल्याची डॉक्टरांची सक्ती. १४ दिवस उपचाराचे आणि इतर असे १ हजार २० रुपये शुल्क काढण्यात आले. अरविंदच्या खिशात कवडी नाही. पैसे आणायचे कुठून हा सवाल त्याच्यासमोर आहे.

कुणीतरी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाची वाट त्याला दाखवली. उपचारादरम्यान आता कोणताही व्यवसाय किंवा मजुरी करण्यास अरविंदचे वडील सक्षम नाहीत. यामुळे खाटेवर असलेल्या वडिलांना उपचारांअभावी मरताना बघणार नाही. हा निश्चय मनाशी केला. पदवी परीक्षा असलेल्या ‘बीए’ दुसऱ्या वर्षाला असलेल्या अरविंदवर कुटुंबांची जबाबदारी आहे. जबाबदारी पेलण्याचे बळ अंगात नाही. परंतु, कुटुंबाच्या पोटासाठी स्वत:ला विकण्याची तयारी त्याने बोलून दाखवली.

नियती सूड उगवतेय

डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, कलेक्टरचा मुलगा कलेक्टर बनत असल्याचे चित्र असतान भंगारवाल्याचा मुलगा अरविंद भंगार वेचणारा बनणार आहे. येथूनच त्याच्या वेदनांचा प्रवास सुरू होणार आहे. अकोला बाजार येथील लक्ष्मीबाई कावळे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अरविंदच्या आयुष्यातून शिक्षणाचा गंध आता पुसला जाणार आहे. मात्र, दानशूरांनी मदत केल्यास अरविंदचे शिकण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.

जाऊ द्या साहेब...काय विचारता. मेडिकलमध्ये मोफत उपचार होतील असे सांगण्यात आले. म्हणून घेऊन आलो. १४ दिवसात १८ हजार खर्च केले. मित्रांकडे नातेवाइकांकडून शंभर, दोनशे, पन्नास असे उसनवारीवर घेऊन आत्तापर्यंत वडिलांच्या औषधाचा खर्च केला. आता शक्य नाही. शिक्षण सोडून वडिलांसारखा भंगारवाला होणार आहे.

-अरविंद भाऊराव जाधव. यवतमाळ, लोणी.

loading image
go to top