Bharat Jodo Yatra : वैचारिक भेद बाजुला सारून ‘भारत जोडो’ला समर्थन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo yatra Support by Yogendra Yadav

Bharat Jodo Yatra : वैचारिक भेद बाजुला सारून ‘भारत जोडो’ला समर्थन

नागपूर : देशातील सत्ताधाऱ्यांच्या शीर्ष नेतृत्वाने इंग्रजांप्रमाणेच ‘तोडा आणि राज्य करा’, ही भूमिका घेतली आहे. लोकांमध्ये, समाजात द्वेष पसरविला जात आहे. या ‘फॅसिस्ट’ वृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी देशातील अनेक संघटना पक्ष आणि वैचारिक भेद बाजुला सारून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला समर्थन देत आहेत, अशी माहिती स्वराज अभियानाचे योगेंद्र यादव यांनी गुरूवारी दिली.

महाराष्ट्रातील विविध पक्ष, संस्था, संघटना आणि चळवळीच्या वतीने भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासंदर्भात नागपुरात तीन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत सहभागी सघटनांच्या प्रतिनिधींनी संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका विशद केली. महाराष्ट्रातील १९३ संघटना, पक्ष यात्रेत प्रत्यक्ष सहभाग नोंदविणार आहे. कोणताही पक्ष किंवा व्यक्तीला समर्थन नाही, तर देश आणि संविधान टिकविण्यासाठी काँग्रेसने आरंभलेल्या अभियानाला हा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यात्रेला राज्यातील विविध क्षेत्रातील १९३ संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून विदर्भातील ५०-६० संघटना भारत जोडो यात्रेत प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. लवकरच ही यात्रा देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होत आहे. दक्षिणेकडे यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात यात्रेची व्यापकता अधिकच वाढेल असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.

पत्रपरिषदेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद रानडे, लोक संघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे, दक्षिणायनच्या अरुणा सबाने, स्त्रीवादी कार्यकर्त्या वर्षा देशपांडे, अदिवासी नेत्या कुसूम अलाम, मुजुमदार, शोकर सोनारकर, वारकरी संप्रदायाचे शामसुंदर सोनार उपस्थित होते.

देशाचा स्वधर्म धोक्यात

देश जळत असताना आपल्याला दोन पक्ष आठवतात. एक जे पेट्रोलची शिशी घेऊन फिरत आहे, तर दुसरा पाण्याने भरलेली बादली घेऊन आहे. अशावेळी आपण आग विझवणाऱ्यांसोबत आहोत. देशाचा स्वधर्म धोक्यात आला आहे, तो वाचवायचा आहे, असे यागेंद्र यादव म्हणाले. दक्षिणायनतर्फे धनवटे नॅशनल कॉलेज येथे विविध जनसंघटनांची नागरिक सभा पार पडली.

दिवसभर चाललेल्या या सभेत जवळपास ६० विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. देश तोडण्याचे षडयंत्र करणाऱ्यांविरुद्ध देश जोडण्याचा हा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, डॉ. गणेश देवी, डॉ. सुखदेव थोरात, प्रतिभा शिंदे, मिलिंद रानडे, शेखर सोनारकर आदी उपस्थित होते.

सरसंघचालकांची मुस्लिमांसोबत चर्चा हे फलित

भारत जोडे यात्रेमुळे देशातील वातावरण बदलत आहे. सरसंघचालकांची मुस्लीम संघटनांसोबत बोलणी सुरू झाली आहे. हे या यात्रेचे फलित आहे. पुढे आणखी बदल दिसून येतील. देशांतील मोठ्या संप्रदायांमध्ये वाद निर्माण करतात त्यापेक्षा मोठे देशद्रोही कोणीही नाही. आपल्या देशात रोज हिंदू-मुस्लिम वाद पसरविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना देशविघातक ठरविले जावे, असे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.