ऋतूचक्रातील बदलाने पक्ष्यांचे स्थलांतर लांबले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bird migration

ऋतूचक्रातील बदलाने पक्ष्यांचे स्थलांतर लांबले

नागपूर : चांगले पर्यावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिलांच्या संगोपनासाठी चांगला अधिवास शोधण्यासाठी दूर अंतरावरून पक्षी येत असतात. पक्ष्यांचे स्थलांतरण ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरीही निसर्गातील बदलाचा त्यांच्या स्थलांतरणावर परिणाम होतो. उपराजधानीसह विदर्भातील तलावांवर ऑक्टोबरच्या उत्तरार्धात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची प्रतीक्षा पक्षीप्रेमींना आहे.

जगभरातील ऋतूचक्रात झालेल्या बदलामुळे मानवाचेच नव्हे तर पक्ष्यांचेही जीवनचक्र बदललेले आहे. यंदा ऑक्टोबरच्या २० तारखेपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची अतिवृष्टी झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान विस्कळित झाले. हातातील पिके वाया गेली. वातावरणातील बदलामुळे अतिपावसाच्या फटक्याने शेतकरी हवालदील झालेला असताना शिकारी पक्ष्यांचे स्थलांतरण लांबलेले आहे.

त्याचे कारण म्हणजे अद्यापही स्थलांतरित पक्ष्यांसाठी हवे असलेले वातावरण अद्यापही तयार झालेले नाहीत. अनेक तलाव तुडूंब भरलेले असल्याचे स्थलांतरित पक्ष्यांना हवा असलेले खाद्यच उपलब्ध नाहीत. तसेच थंडीही लाबलेली असल्याने स्थलांतरित पक्षी महिनाभर उशिरा येण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

हिमालय पार करण्यापूर्वी तिबेट, कझाकस्तान, रशिया, मंगोलियाकडून ते दक्षिणेकडे स्थलांतर करतात. नागपुरात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम असतो. अद्यापही ते आलेले नाहीत. ते महिनाभर उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल, वादळ, अवकाळी पाऊस आणि उशिरा सुरू होणारा हिवाळा या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत.

पक्ष्यांचा हजारो किलोमीटरचा प्रवास

बर्फाच्छादित प्रदेशात जलाशये थंडीमुळे गाठतात. परिणामी, पक्ष्यांना अन्नाची टंचाई भासते. सुरक्षित वातावरणात पक्षी स्थलांतरित करतात. हिवाळ्यात राज्यात विविध ठिकाणचे हवामान आणि खाद्य पदार्थ मुबलक मिळत असल्याने अनेक विदेशी पक्षी चार हजार ते ५२ हजारो किलो मीटरचे अंतर पार करून जलाशयावर येत असतात.

स्थलांतरित पक्ष्यांचे ठिकाण असलेले मटकाझरी, सायकी, वडगाव हे तलाव पाण्यानी तुडुंब भरलेले आहे. त्यामुळे आवश्यक अधिवास आणि खाद्य यावर्षी नाही. परिणामी, ज्या तलावांवर, किनारे तसेच आवश्यक अधिवास व खाद्याची उपलब्धता आहे, त्याचठिकाणी स्थलांतरित पक्षी येतील. तत्पूर्वी काही पक्षी या तलावांवर खाद्य आहे की नाही याची चाचपणी करून स्थलांतरित पक्षी येतात.

- अविनाश लोंढे, मानद वन्यजीव रक्षक