esakal | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दारी भाजपचे नगरसेवक, महापालिकेतील गैरव्यवहाराचे दिले पुरावे
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दारी भाजपचे नगरसेवक, महापालिकेतील गैरव्यवहाराचे दिले पुरावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेतील (chandrapur municipal corporation) आर्थिक गैरव्यवहाराची अनेक प्रकरण समोर आली आहेत. या प्रकरणांची राज्यशासनाने चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस आणि भाजपच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (congress state president nana patole) यांच्याकडे मंगळवारला केली. सत्ताधारी पक्षातील भाजपच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे दिले आहे, असे पत्रकार परिषदेत पटोले यांनी सांगितले. या गैरव्यवहाराची एखाद्या समिती मार्फत चौकशी केली जाईल, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे. विधानसभेत सुद्धा मनपातील गैरव्यवहाराची प्रकरण लावून धरु असे पटोले म्हणाले. (bjp corporator gives evidence of corruption in chandrapur municipal corporation to nana patole)

हेही वाचा: भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून तीन ठार; दोघे जखमी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चंद्रपूर जिल्ह्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेतला. दरम्यान भाजपच्या काही नगरसेवकांनी नाना पटोले यांची भेट घेतली. भाजपच्या नगरसेवकांचे दोन गट सध्या पालिकेत आहे. त्यातील एका गटातील हे नगरसेवक असावे, असे बोलले जात आहे. या नगरसेवकांनी मनपातील अनेक कामातील गैरव्यवहारांची लेखी तक्रार दिली, अशी माहिती पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या नगरसेवकांकडून मनपातील गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्या आहेत, याला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही यावेळी दुजोरा दिला.

पंधरा दिवसांपूर्वी सन २०१५-१६ चा लेखापरिक्षण अहवाल समोर आला. या काळात महापौरपदी राखी कंचर्लावार आणि आयुक्त सुधीर शंभरकर होते. या अहवालात दोनशे कोटींची अनियमितता आढळली आहे. ३९ कोटींची वसूली सुचविली आहे. काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी लेखापरिक्षण अहवालासोबतच मनपातील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली. तसे लेखी निवेदन दिले. यात महापौर ऱाखी कंचर्लावार आणि तत्कालीन आयुक्त सुधीर शंभरकर यांच्याही चौकशीच्या मागणीची उल्लेख आहेत. याशिवाय भाजपचे नगरसेवक सुद्धा भेटल्याचे पत्रकार परिषदेत पटोले यांनी सांगितले. अमृत योजना, कचरा संकलन , कोविडच्या काळातील कामात प्रचंड गैरव्यवहार झाला आहे. याची चौकशी राज्य शासनाने करावी, अशी मागणी या नगरसेवकांनी केली. या गंभीर प्रकरणाचे पुरावे सुद्धा या नगरसेवकांनी दिले आहेत, असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

जनतेच्या पैशाची या पध्दतीने आर्थिक लुट योग्य नाही. मनपातील अनियमिततेची एका समितीमार्फत चौकशी केली जाईल. विशेष म्हणजे येत्या आठ दिवसात याप्रकरणी समितीचा निर्णय घेतला जाईल असेही पटाेले म्हणाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल. तसेच वेळप्रसंगी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली तर तिथे सुध्दा आम्ही भांडू असेही ते म्हणाले. भाजपाचे काही लोकप्रतिनिधी विधानसभेत केवळ स्वच्छतेचा आव आणतात, मात्र चंद्रपुर महानगरपालिकेतील कारभार बघितला तर किती गैरव्यवहार सुरू आहे, हे लेखापरिक्षण अहवालून समाेर आले असा टाेलाही यांनी हाणला. यावेळी खासदार बाळू धानाेरकर, आमदार सुभाष धाेटे, आमदार प्रतिभा धानाेरकर. आमदार अभिजित वंजारी, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संताेष रावत ,जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष रामू तिवारी उपस्थित होते.

महापौरांविरोधात असंतोष -

भाजपच्या नगरसेवकांच्या असंतोषाचे कारण मनपातील विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीत दडले आहे. राखी कंचर्लावार यांना महापौरपदी पक्षाने संधी दिल्यापासून भाजपच्या नगरसेवकांच्या एका गटात नाराजी पसरली होती. कंचर्लावार आणि त्यांचे नगरसेवक पती संजय कंचर्लावार आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. दोघेही पक्षात नवखे असताना मनपाची सुत्र निष्ठावंताना डावलून कंचर्लावार यांच्या हाती दिले. त्यातच स्थायी समितीच्या सभापतीपदी रवि आसवानी यांना संधी दिली. सलग चार वेळा निवडून येणारे वसंता देशमुख यांना डावलले. त्यामुळे असंतोष आणखी वाढला. याच असंतोषातून भाजपचे काही नगरसेवकांनी चक्क काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे मनपातील गैरकारभाराची तक्रार केली.

loading image
go to top