esakal | कुठलीही पदवी नसताना ग्रामस्थांवर उपचार, उमरीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

बोलून बातमी शोधा

Bogus_Doctor
कुठलीही पदवी नसताना ग्रामस्थांवर उपचार, उमरीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावनेर (जि. नागपूर) : बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागात आपला व्यवसाय थाटला असून, ते भोळ्याभाबड्या ग्रामस्थांची लूट करीत आहेत. असाच एक प्रकार सावनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी उघडकीस आणला.

हेही वाचा: दहा वर्षांपासून अंथरुणावर, निरनिराळे संसर्ग; पण घरातच उपचार घेत केली कोरोनावर मात

उमरी गावात डॉ. विश्वजित विष्णोई या बोगस डॉक्टरचा दवाखाना बंद करण्यात आला. या बोगस डॉक्टरांकडे ना वैद्यकीय पदवी ना वैद्यकीय परवानगी आहे. उपचारानंतर रुग्णांची तब्येत बिघडली की, त्यांना दुसरीकडे उपचार घेण्याचा सल्ला देतात. तोपर्यंत रुग्णांकडून पैसे उकळतात. उशीर झाल्यास रुग्ण दगावण्याचा प्रकार घडू शकतो. उमरी परिसरात जवळपास शंभरच्या वर पोहोचलेली कोरोनाबाधितांची संख्या व एकाच महिन्यात झालेल्या दहा ते अकरा लोकांच्या मृत्यूमुळे प्रशासन अधिकच गंभीर झाले. या कारणांचा शोध व उपाययोजनेसाठी उमरी येथील ग्रामपंचायतमध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रतिनिधी, कोरोना योद्धे व डॉक्टरांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विष्णोई आले होते. त्यांना वैद्यकीय पुराव्याबद्दल विचारले असता त्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. नागणे यांनी वैद्यकीय पदवी परवाना किंवा इतर कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. कारवाई प्रस्तावित आहे. मात्र, दवाखाना बंद करण्याचा आदेश दिल्याने त्याने गावातून पळ काढल्याचे समजते.

हेही वाचा: धक्कादायक! नागपुरात महिनाभरात तब्बल २२८२ कोरोनाबळी; ग्रामीण भागातही रुग्णसंख्या अधिक

रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडणारे असे डॉक्टर आढळून आल्यास त्यांना गावात स्थान देऊ नये. तसेच उपचाराच्या नावावर घरी येत असल्यास त्यांच्याकडून उपचार टाळावे. गावात दवाखाना उघडलेला आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतीने चौकशी करावी, असा सल्ला पंचायत समिती सदस्य गोविंद ठाकरे यांनी दिला.

रुग्णांनी बोगस डॉक्टरांच्या नादात पडू नये. ग्रामीण आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करून घ्यावी. पॉझिटिव्ह असल्यास घाबरू नये. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावा. लसीकरणाला सहकार्य करावे.
-अनिल नागणे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सावनेर