प्रेमीयुगलाने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन; घरच्यांच्या डोळ्यासमोरच आत्महत्या | Nagpur News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide

प्रेमीयुगलाने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन; घरच्यांच्या डोळ्यासमोरच आत्महत्या

बेला / समुद्रपूर : ‘तो’ सज्ञान पण ‘ती’ अल्पवयीन. म्हणतात की प्रेमाला वयाचं, जातीचं आणि भौगोलिक कक्षांचं बंधन नसतं. ही सर्व बंधन झुगारून दोघांनी एकत्र येत संसाराचा वेल फुलविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचं वय आडवं आलं. ‘साथ जियेंगे’ची शपथ घेणाऱ्या या दोघांनीही घरातून पळ काढला. त्यांच्या मागावर असलेले कुटुंबीय दुरून दिसताच या जोडप्याने ‘साथ मरेंगे’चा विश्वास सार्थ ठरवत एकमेकांचा हात घट्ट पकडून विहिरीत उडी घेतली व जीवनाचा अंत केला.

सदर जोडपे नागपूर जिल्ह्यातील असून आत्महत्येचे स्थान वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात आहे. नागपूर जिल्ह्यातील बेला येथील महेश शालीक ठाकरे (वय २६) याचे विमलताई तिडके विद्यालयात नवव्या वर्गात शिकणाऱ्या वडगावच्या १६ वर्षीय मुलीवर प्रेम होते. आपल्या प्रेमाला कुटुंबीय मान्यता देणार नाही, या भीतीने दोघांनीही आपल्या आईवडिलांना न सांगता शुक्रवारी (२५ मार्च) घरून पलायन केले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता होण्याची पोलिसात तक्रार दिली व शोधाशोध सुरू केली.

सोमवारी (ता. २८) ते दोघेही बेला-कुर्ला रस्त्यावर असल्याची माहिती ठाकरे कुटुंबीयांना मिळाली. त्यांनी लगेच तिकडे धाव घेतली. कुटुंबीयांना पाहून दोघेही घाबरले. घरच्यांच्या स्वाधीन झालो तर एकमेकांपासून वेगळे व्हावे लागणार या भीतीपोटी त्या प्रेमी युगुलाने एकमेकांचा हात घट्ट पकडून कुर्ला शिवारातील शेतकरी कमलेश कांबळे यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय विहिरीजवळ पोहोचले. मात्र, दोघांचेही मृतदेह विहिरीतील गाळात फसल्याने त्यांना वाचविण्यासाठी केलेल्या उपाययोजना फोल ठरल्या.

घटनास्थळ वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने घटनेची माहिती मिळताच तेथील ठाणेदार प्रशांत काळे, पोलिस कर्मचारी विक्की मस्के, प्रमोद जाधव घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून प्रेमीयुगलाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत. कुटुंबीयांच्या डोळ्यांसमक्ष भरदुपारी घडलेल्या या घटनेने परिसरातील समाजमन हळहळून गेले.

Web Title: Boy And Girls Suicide Love Couple Suicide Front Eyes Family Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..