Nagpur Crime News : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची माहिती पुरविणाऱ्या निशांतला जन्मठेप

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची गोपनीय माहिती पाकिस्तानातील आयएसआयच्या हस्तकासोबत उघड केल्याच्या आरोपात वैज्ञानिक निशांत प्रदीप अग्रवाल याला दोषी ठरविले.
Nishant Agarwal
Nishant Agarwalsakal

नागपूर - ब्रह्मोस क्षेपणास्त्राची गोपनीय माहिती पाकिस्तानातील आयएसआयच्या हस्तकासोबत उघड केल्याच्या आरोपात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने वैज्ञानिक निशांत प्रदीप अग्रवाल (वय ३२, रा. नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) याला दोषी ठरविले आहे. माहिती तंत्रज्ञान आतंकवाद व शासकीय गुपित कायद्यानुसार त्याला सश्रम जन्मठेप, तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या कायद्यानुसार झालेली नागपूरमधील ही पहिलीच शिक्षा मानली जात आहे.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी हा निर्णय दिला. २०१८ मध्ये त्याला उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) व लष्करी गुप्तचर संस्थेच्या (एमआय) पथकाने अटक केली होती. त्यावेळी ब्रह्मोस एरोस्पेसच्या, नागपूर युनिटमध्ये २०१४ पासून निशांत सीनियर सिस्टिम इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. उज्ज्वलनगर येथे भाड्याच्या घरात त्याचे वास्तव्य होते.

याच दरम्यान नेहा शर्मा व पूजा रंजन या नावाने त्याला फेसबुक रिक्वेस्ट आल्या आणि तो हनीट्रॅपमध्ये अडकला. तसेच, सोशल मीडिया अकाऊंटवरून आलेल्या नोकरी विषयक लिंक ओपन केल्याने त्याच्या वैयक्तिक लॅपटॉपमध्ये मालवेअर (व्हायरस)शिरला. याच आधारे सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेत्रणास्त्रांची संवेदनशील गोपनीय माहिती पाकची गुप्तहेर संस्था आयएसआयपर्यंत पोहोचली, असा संशय एटीएसला होता.

८ ऑक्टोबरला २०१८ रोजी पहाटे एटीएसच्या पथकाने नागपुरात धडक दिली. निशांत काम करीत असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्रकल्प व त्याच्या निवासस्थानी छापा टाकला होता. निशांतला अटक करून लखनऊला नेण्यात आले होते. त्याच्याकडून लॅपटॉप, टॅब आणि मोबाईलसह काही पेन ड्राईव्हही जप्त करण्यात आले होते. पाकिस्तानी हेर नागपुरात पकडल्याच्या वृत्ताने देशभर खळबळ उडाली होती.

पाच महिने भारतीय सुरक्षा यंत्रणांमधील वेगवेगळ्या तपास पथकांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर, अचानक १४ मार्च २०१९ रोजी यूपी एटीएसने प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत नागपुरात आणले होते. तेव्हापासून तो मध्यवर्ती कारागृहात होता. मागील वर्षी त्याची जामिनावर सुटका झाली होती.

खटल्यामध्ये दोषी आढळल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली. त्याला नागपूर एटीएसमार्फत लखनऊला नेण्यात येणार आहे. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ज्योती वजानी यांनी बाजू मांडली.

ब्रह्मोसची वैशिष्ट्ये

  • ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त संशोधनातून तयार झालेले क्षेपणास्त्र आहे.

  • कमी अंतरापर्यंत वार करणारे हे क्षेपणास्त्र जमीन, विमान, जहाज आणि पाणबुडीत वापरले जाते.

  • हवेतच मार्ग बदलण्याची क्षमता.

  • अवघ्या १० मीटरच्या उंचीवरून उडण्याची क्षमता.

पाक एजंटच्या चौकशीतून सुगावा

उत्तरप्रदेश एटीएसने निशांतला अटक करण्याच्या काही महिन्यांपूर्वी आयएसआय एजंटाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून निशांत अग्रवालचे नाव समोर आले. मिलिटरी इंटेलिजन्सला याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर यूपी एटीएस व मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकांनी त्याची माहिती जमवणे सुरू केले होते. निशांत हा फेसबुकवर पाकच्या महिला मित्रांसोबत डीआरडीओची माहिती शेअर करीत असल्याचा संशय होता.

सात महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

निशांत कुरुक्षेत्रच्या एनआयटीचा पासआऊट आहे. तो ब्रह्मोस मिसाइल युनिटच्या हायड्रॉलिक-न्यूमॅटिक्स आणि वॉरहेड इंटिग्रेशन विभागाच्या ४० लोकांच्या चमूचे नेतृत्व करत होता. २०१७-१८ मध्ये युनिटने त्याला युवा वैज्ञानिक पुरस्कारानेही गौरविले होते. ब्रह्मोसच्या सीएसआर, संशोधन आणि विकास (आरअँडडी) ग्रुपचाही तो सदस्य होता. घटनेच्या वेळी ब्रह्मोस नागपूर व पिलानी साइट्सचे प्रोजेक्ट्स पाहात होता. परंतु, ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला अटक झाली. तर, घटनेच्या सात महिने आधी मार्च २०१८ मध्येच त्याचे लग्न झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com