esakal | क्षुल्लक कारणावरून पत्नीचा हात तोडला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

क्षुल्लक कारणावरून पत्नीचा हात तोडला; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : कामावरून घरी आल्यानंतर पत्नी क्षुल्लक कारणावरून बडबड करीत पतीला त्रस्त करीत होती. रोजच्या या कटकटीला कंटाळून पतीने रागाच्या भरात पत्नीच्या हातावर बॅट मारून हात मोडला. घरगुती भांडणातून ही घटना जरीपटक्यात घडली. अपेक्षा बोरकर (३५) असे जखमी पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद बोरकर हे पत्नी अपेक्षा आणि दोन मुलांसह जरीपटक्यातील मायानगरात राहतात. अरविंद बोरकर हे खासगी काम करतात. त्यांचे आईवडील शेजारीच पण त्यांच्यापासून वेगळे राहतात. काही दिवसांपासून पत्नी अपेक्षा ही क्षुल्लक कारणावरून पतीसोबत वाद घालत होती. एका महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा वाद घातल्याने दोघांत भांडण झाले होते. त्यामुळे ती बहिणीकडे निघून गेली होती.

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

रविवारी दुपारी दोनच्या सुमारास जखमी अपेक्षा बोरकर हिचे घरगुती कारणावरून पती अरविंदसोबत वाद झाला. या वादावादीत ती बडबड करायला लागली. त्यामुळे अरविंदने लाकडी बॅटने अपेक्षाच्या हातावर मारून हात मोडला. ती गंभीर जखमी अवस्थेत पोलिस स्टेशनला पोहोचली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.

दोन भावंडांना भोसकले

दुचाकीचा कट लागल्यावरून झालेल्या भांडणात दोन भावंडांना चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना गणेशपेठ हद्दीत आशीर्वाद टॉकीजसमोर घडली. रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शुभम आदोराम वर्मा (२१) आणि जयशंकर आदोराम वर्मा (२८, रा. मानेवाडा) हे दोघे आशीर्वाद टॉकीज चौकातून पायी जात होते. त्यावेळी आरोपी अभय विनोद कांबळे (२५) आणि अन्य तीन आरोपी दुचाकीने जात होते. अभयच्या दुचाकीचा कट शुभमला लागला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत आरोपींनी दोघाही भावांना चाकूने व लोखंडी रॉडने मारून जखमी केले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top