Nagpur News : वेकोलिसह रेल्वे अधिकाऱ्यांच्या घरावर छापे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI raided residence of official of Stern Coalfield Limited Vecoli in Nagpur

Nagpur News : वेकोलिसह रेल्वे अधिकाऱ्यांच्या घरावर छापे

नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि)च्या एका अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयने मंगळवारी सकाळी नागपूर येथील निवासस्थानी छापा टाकला. मनोज पुनिराम नवले (नागपूर) असे अधिकाऱ्याचे नाव आहे. सध्या ते उमरेड येथील वेकोलिच्या कार्यालयात कार्यरत आहे.

या कार्यालयावरही सीबीआयने छापा टाकला. अवैध उत्पन्न आणि त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण संशयास्पद कागदपत्रे सीबीआयला आढळल्याची माहिती आहे. सीबीआयाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंत्याविरोधात अघोषित संपत्तीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला.

अवध बिहारी चतुर्वेदी असे या अभियंत्याचे नाव असून २०१६ ते २०२२ या कालावधीत १.६२ कोटींची अघोषित संपत्ती जमविल्याचा आरोप आहे. प्राप्त माहितीनुसार, काही वर्षापूर्वी मनोज नवले हे बल्लारपूर-चंद्रपूरच्या वेकोलिमध्ये नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत होते.

नवले कोळसा खदान प्रकल्पाच्या शेत जमिनीबाबतची अनेक प्रकरणे हातळत. त्यामुळे खाणीमध्ये कोणत्या जमीन जाणार याची माहिती त्यांना मिळत होती. त्या आधारावर जमीन धारकांना हेरून त्यांच्यासोबत व्यवहार करीत आणि हजारो रुपयांची लाच घेत होते.

त्याबद्दलच्या अनेक तक्रारी सीबीआयकडे आल्या होत्या. त्या आधारे सीबीआयच्या पथकाने पाळत ठेवली. दरम्यान, नवले यांनी मंजुरी दिलेल्या काही जमिनीच्या अधिग्रहण प्रकरणात कोट्यवधीची कमाई केल्याची माहिती पुढे आली होती. चंद्रपूर येथे कार्यरत असताना त्यांच्यावर यापूर्वीही सीबीआयची कारवाई झाल्याची माहिती पुढे आली आहे.

सीबीआयकडे नवले विरुद्ध पुन्हा एक तक्रार काही दिवसापूर्वी आली. त्यानुसार सीबीआयचे पोलिस उपनिरीक्षक एम. एस. खान यांनी २९ डिसेंबर २०२२ ला गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी सकाळीच सीबीआयचे पथक त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी धडकले.

दरम्यान, नवले यांना नोटीस देऊन घर आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. नवले यांना कार्यालयात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांच्या घरासमोर पोलिस तैनात केले आहे. नवले यांच्या खुल्या चौकशीत सीबीआयला त्यांनी लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे पथकाला आढळले आहे.

तसेच ६७ लाख ७ हजार रुपये एकूण कमाईच्या अतिरिक्त आढळले आहे. त्यामुळे सीबीआयने नेवले यांना ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे वेकोलिच्या लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

नवले यांच्या नावर धामना आणि गडचिरोली येथे जमिनी असू पत्नीच्या नावावर चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरा गावात चार जमिनी असल्याचे जप्त केलेल्या कागदपत्रातून उघडकीस आले आहे. शिवाय सहा बॅंक खात्यात सहा लाख १६ हजार रुपये रोख आणि १३ लाख २९ हजारांचे दागिने आढळले आहे.

मध्य रेल्वेचे अधिकारीही सापळ्यात

नागपूर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंत्याविरोधात अघोषित संपत्तीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. अवध बिहारी चतुर्वेदी असे संबंधित अभियंत्याचे नाव आहे.

चतुर्वेदीला १९९४ मध्ये मध्य रेल्वेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाल्यावर पहिली पोस्टिंग जळगाव येथील वरणगाव येथे देण्यात आली होती. त्यानंतर पदोन्नती झाल्यावर भुसावळ व नागपूर येथे सहाय्यक विभागीय अभियंता (दक्षिण) या पदावर त्याने कार्य केले. २०१६ ते मार्च २०२२ या कालावधीत चतुर्वेदीने उत्पन्नाच्या तुलनेत जास्त मालमत्ता व वस्तू खरेदी केल्या.

सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत ही संपत्ती भ्रष्टाचारातून मिळवल्याची बाब समोर आली. चतुर्वेदीने या कालावधीत १ कोटी ६२ लाख ८६ हजार ८७५ रुपयांची अघोषित मालमत्ता जमविली. सीबीआयने चौकशीनंतर चतुर्वेदीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.