सर्वच शाळांना सेट्रल किचनमार्फत पोषण आहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central kitchen help serve Nutrition meals Food to all schools

सर्वच शाळांना सेट्रल किचनमार्फत पोषण आहार

नागपूर : आता शहरातील सर्वच शाळांना केंद्रीय स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) प्रणालीच्या माध्यमातून शालेय पोषण आहाराचा पुरवठा होणार आहे. याचा ७४६ शाळांतील एकूण १ लाख ४८ हजार ९०० वर विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.

शहर व ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत पोषण आहार दिला जातो. ग्रामीण भागासोबतच शहरातीलही हजारो शाळांमध्ये कोविडपूर्वी प्रत्यक्ष आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जात होता. तर नागपूर शहर, कामठी, वाडी व महादुला येथील ५०९ शाळांना सेंट्रल किचनकडून आहार शिजवून दिला जात होता. शाळेत प्रत्यक्ष आहर शिजविणाऱ्या व सेंट्रल किचनअंतर्गतच्या शाळांकरिता पूर्वी कज्युमर फेडरेशनकडूनच आहारासाठी आवश्यक धान्याचा पुरवठा होत होता.

कोविड काळात विद्यार्थ्यांना थेट धान्य स्वरुपातच त्याचे वितरण करण्यात आले. सेंट्रल किचनअंतर्गत येणाऱ्या संस्थांचा जिल्ह्यासाठी ३ वर्षाचा करारनामा झालेला आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून कोविडमुळे त्यांचे कामच बंद होते. त्यातच एप्रिलपासून या सेंट्रल किचनअंतर्गत येणाऱ्या ५०९ शाळांतील विद्यार्थ्यांना धान्याचा पुरवठाच झालेला नव्हता. त्यामुळे शासनाने या सेंट्रल किचन अंतर्गत येणाऱ्या शाळांना तूरडाळ, हरभरा, चवळी व मूग या धान्यादी वस्तुंचा पुरवठा करावयाचे निर्देश दिले.

शहरातील शाळांमध्ये पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचनचा कंत्राटदारांचे कंत्राट जून महिन्यात संपत आहे. त्यातच आता शहरात येणाऱ्या महापालिकेसोबतच सर्व अनुदानित अशा ४२९ वर शाळांसोबतच महादुला, वाडी आणि कामठी येथील एकूण अशा ७४६ शाळांमध्ये सेंट्रल किचनद्वारे पोषण आहार पुरविण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार शहरातील शाळांकरिता निविदाही प्रकाशित झाल्या असून त्या १७ मे २०२२ रोजी उघडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.