Chandrapur : वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 वाघ

Chandrapur : वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू

नागपूर : शेतात काम करीत असलेल्या महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात घडली. तर शेतानजीकच्या जंगलात बैल चारत असताना टी-६ वाघिणीने हल्ला करून एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) मध्ये जाईबाई तोंडरे या आज (ता. ३) धानपीक काढण्यासाठी शेतात गेल्या होत्या. शेतात लपून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांचे शरीर धडापासून वेगळे केले. या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. वाघांची नसबंदी करा किंवा स्थानांतरण करा, अशीही मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड, क्षेत्र सहाय्यक मिलिंद सेमस्कर, वनरक्षक कागणे व पोलिस व वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी तातडीने मदत करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यात शेतानजीकच्या जंगलात बैल चारत असताना टी- ६ वाघिणीने हल्ला करून एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना गुरुवारी (ता. ३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून ८ किलोमीटर अंतरावरील राजगाटा चेक गावानजीक घडली.

सुधाकर भोयर (वय ५०) रा. राजगाटा चेक असे मृताचे नाव आहे. सुधाकर भोयर बैल घेऊन शेतावर गेले होते. शेतालगतच्या जंगलात बैल चारत असताना अचानक भोयर यांच्यावर वाघिणीने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. वाघांचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हल्ला करणारी टी-६ वाघीण असल्याचे पाेर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांनी सांगितले. या वाघिणीने आतापर्यंत ६ जणांचे बळी घेतले. राजगाटा चेक परिसरात टी-६ वाघिणीचे अस्तित्व असून, दोन दिवसांपूर्वी ती वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आली. त्यामुळे वनविभागाने परिसरातील नागरिकांना नोटिशीद्वारे जंगलात न जाण्याची सूचना केली होती. तरीही नागरिक जंगलात जात असल्याने हल्ले वाढले आहेत.