
Chandrashekhar Bawankule : सरडासुद्धा वेळेनुसार रंग बदलतो, उद्धव ठाकरे हे त्याही समोर गेले आहेत; चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : सरडासुद्धा वेळेनुसार रंग बदलतो. परंतु, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे त्याही समोर गेले आहेत, अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
त्यांनी जीवनात १०० दा संघाचा विचार, संघाची प्रेरणा, संघामध्ये माणूस कसा घडतो याबद्दल अनेकदा भाष्य केलयं. त्यांच्या स्मृतीमध्ये थोडा फरक पडला आहे. अनेकवेळा त्यांनी केलेलं संघाबद्दलचं मत हे प्रेरणास्त्रोत असल्याचं त्यांनी व्यक्त केलयं.
आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघस्थानी गेल्याबरोबर ज्या पद्धतीने त्यांनी राजकीय वक्तव्य केलं, हे निषेध करणारं आहे. खरतर जेव्हा आम्ही रेशीमबाग येथे दर्शनाकरीता जात असतो. तेव्हा समाजाच्या दीनदुबळ्यांबद्दल सेवा करण्याची भावना निर्माण होते.
त्यामुळे या स्थळाचा राजकीय पद्धतीने वापर हा निषेधार्ह असून मी त्यांचा निषेध करतो, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला. सीमाप्रश्न वादावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, आधी ठाकरे बोलतात त्यामुळे तिकडून प्रतिउत्तर मिळतं.
अशा प्रकारे लोकांच्या भावना भडकावण्याचं काम ठाकरे करीत आहेत. खरतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या राज्याच्या अखंडतेकरीता न्यायालयात व सरकार म्हणून जे प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नाला ठाकरेंनी अभिनंदन करायला हवं.
परंतु, विवादित कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भाग केंद्रशासित करा अशी मागणी करून ते राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम करीत आहेत. त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी सीमाभागातील लोकांकरीता काहीच केले नाही. त्यांना संरक्षण दिलं नाही.
त्यामुळे उद्धव ठाकरेंना सीमाभागावरील विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळेंनी यावेळी केली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक इंचही जागा इकडची तिकडे जाणार नाही, याकरीता इतका सक्षम प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ठाकरेंनी सीमावर्ती भागातील नागरिकांच्या भावना भडकवू नये, असे बावनकुळे म्हणाले.
अजित पवारांना टोला
गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात राजकीय युद्ध सुरू आहे. 'मी जर मनावर घेतलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल', असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला. त्यावर, मी एकच दौरा केला तर ते माझा करेकट कार्यक्रम करायला निघाले.
पवार कुटुंबिांबाबात बारामतीत नाराजी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल,' अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी हा इशारा ऐकल्यापासून माझी झोपच उडालीये... मला तर आता राजकीय संन्यासच घ्यावासा वाटतोय असा खोचक टोला बावनकुळेंना लगावला.
तर त्यावर बावनकुळे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले, शरद पवारांच्या नावाने अजित पवार मोठे झालेले आहेत. त्यांचे अस्तित्व काय? कर्तृत्व काय? त्यांनी केवळ सत्तेपासून पैसा व पैशांपासून सत्ता एवढच काय ते केलयं. अजित पवारांनी दिलेलं आव्हान आम्हाला मान्य आहे. नक्कीच त्यांचे राजकीय संन्यास घेण्याचे दिवस येतील, २०२४ मध्ये नक्कीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल.