esakal | साचणाऱ्या पाण्यामुळे चुनाभट्टी रहिवासी त्रस्तINagpur
sakal

बोलून बातमी शोधा

साचणाऱ्या पाण्यामुळे चुनाभट्टी रहिवासी त्रस्त

साचणाऱ्या पाण्यामुळे चुनाभट्टी रहिवासी त्रस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अजनी चौक ते अजनी स्थानक या मार्गावर उजव्या हाताला अंबिका नगर, चुनाभट्टी परिसर वसलेला आहे. मुख्य रस्त्यावर वारंवार भर पडल्याने ही वस्ती काहीशी सखल भागामध्ये मोडायला लागली आहे. यामुळे, गेल्या १५ ते २० वर्षांपासून स्थानिक नागरिक पावसाच्या साचणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त आहेत. चार दिवसांआधी पडलेल्या पावसाचे पाणी आजही परिसरामध्ये साचलेले पाहायला मिळते.

तीन ते चार तास पाऊस आल्यास परिसर जलमय झालेला असतो. तर, अंबिका नगरला लागूनच असलेल्या प्रशांतनगरमधील काही भागात दोन-दोन दिवस पाण्याचा निचरा होत नाही. निचरा होण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याने परिसरात रस्त्यावर जागो जागी खड्डे तयार झाले आहे. अंजनी स्थानकाकडून नरेंद्र नगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी अंबिकानगर येथून जाणार रस्ता सोयीचा असल्याने या मार्गावर सतत वर्दळ पाहायला मिळते. या वाहनचालकांना वस्तीमध्ये साचणाऱ्या पाण्याचा आणि या खड्यांचा सामना करावा लागतो. वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे लगतच्या घरामध्येसुद्धा पाणी उडते.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

वारंवार लोकप्रतिनिधींच्या मागे लागून लागून तीन ते चार महिन्यांपूर्वी सिवेज लाइनचे काम या वस्तीमध्ये करण्यात आल्याची माहिती रहिवाशांनी दिली. या विकासकाम प्रमाणे साचणाऱ्या पाण्यासाठी देखील काही उपाययोजना कराव्या, यासाठी रहिवासी प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींना साकडे घालतात. प्रत्येक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आश्‍वासन देत आशेचे किरण दाखविण्यात येतात. परंतु, गेल्या वीस वर्षापासून ही आश्‍वासने केवळ मृगजळच ठरत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेत्यांचा हा मतदार संघ असल्याने रहिवाशांना त्यांच्याकडून मोठी आशा आहे. मात्र, निवडणूक होऊन वर्षभराचा कार्यकाळ लोटून गेल्यानंतरही साधी डागडुजी देखील करण्यात आली नसल्याचे एका ज्येष्ठांनी सांगितले.

"रेल्वे लाईन, एफसीआय गोडाऊन मधून वाहत येणारे पाणी आमच्या अंबिका नगरमध्ये शिरते. एफसीआय प्रशासनाने त्यांच्या परिसरातील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून लहान लहान नाल्या बनविल्या आहेत. यातून वाहून येणारे पाणी देखील आमच्या वस्तीत शिरते. माझ्या घराच्या पायरीपर्यंत पाण्याची पातळी दरवर्षी पाहायला मिळते. गेल्या १५-२० वर्षांपासून रहिवाशांचे हेच दुखणे आहे."

-विजय मसराम, रहिवासी अंबिका नगर

"प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी सिवेज लाइनचे काम केले. मात्र, पावसाच्या साचणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून प्रशासनाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. वस्तीमध्ये काही जुन्या विहिरी आहेत. पूर्वी सर्व जण या विहिरीचे पाणी प्यायचे. आता वाहत येणारे पाणी विहिरीत साचत असल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. उमेदवार निवडणुकीपूर्वी फक्त आश्वासने देतात. निवडून आल्यावर मात्र याबाबत पावले उचलत नाही."

-रवींद्र खडसे, सहकारनगर

"अंजनी भागातून वाहत येणारे पाणी याठिकाणी सतत साचून असते. साचणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील रस्त्यांवर जागो जागी खड्डे तयार झाले आहेत. साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे, वाहनचालकांना हादरा बसतो. परिसरातील नागरिक आपापल्या परीने हे खड्डे बुजवितात. या साचणाऱ्या पाण्यावर लोक प्रतिनिधींनी लवकरात लवकर तोडगा काढायला हवा."

-आदेश मोहोड, प्रशांत नगर

loading image
go to top