esakal | पोलिसांच्या मारहाणीत दिव्यांगाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप; तपास CIDकडे
sakal

बोलून बातमी शोधा

cid

पोलिसांच्या मारहाणीत दिव्यांगाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप; तपास CIDकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पोलिसांनी (nagpur police) केलेल्या बेदम मारहाणीत दिव्यांग असलेल्या मनोज हरिभाऊ ठवकर (वय ३५ रा.शारदा चौक) याचा मृत्यू झाला, असा आरोपी नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा, यासाठी हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपविण्यात आला आहे. सीआयडीच्या पथकाने या प्रकरणाचे दस्तऐवज ताब्यात घेतले असून तपासही सुरू केला आहे. (CID will do investigation of physical disable manoj thavkar death case)

हेही वाचा: काहीही हं... म्हणे गाडी खराब झाल्याने बी फॉर्म नाही!

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पारडी चौकात पोलिस नाकबंदीदरम्यान वाहनचालकांची तपासणी करीत होते. मनोज व त्याचा साथीदार (एमएच-४९-एएफ-५१११) या क्रमांकाच्या मोपेडेने जात होता. पोलिसांना बघताच मनोजचा साथीदार पळाला. पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे यांनी मनोज याला मोपेड थांबविण्याचा इशारा केला. त्याने न थांबता वेग वाढवला. पीएसआय मुकेश यांनी मोपेडच्या मागील करिअर पकडले. मनोज याने सुमारे ५० फुटांपर्यंत मुकेश यांना फरफटत नेले. मनोज पळून गेला. पीएसआयने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावले आणि बाईकने त्याचा पाठलाग केला. मनोजला काही अंतरावर पकडले आणि जबर मारहाण केली. मनोज हा दिव्यांग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी मनोज याला पोलिस स्टेशनमध्ये नेले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. जवळपास दीड तास मनोज पोलिस ठाण्यात बसून होता. त्याला मारहाण झाल्यामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत होता. काही वेळातच तो खाली कोसळला. पोलिसांनी त्याला भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मारहाण केल्यानेच मनोजचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी भवानी हॉस्पिटलला घेराव घातला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच पोलिसांचा प्रचंड ताफा पारडीत पोहोचला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रकरणाची माहिती घेत पोलिसांना सूचना दिल्या. तसेच या प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा, यासाठी प्रयत्नही केले.

शवविच्छेदनाचे चित्रीकरण

गुरुवारी मेयो हॉस्पिटलमध्ये मनोजचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे चित्रीकरणही करण्यात आले. पोलिसांनी घटनेची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाला दिली. महासंचालकांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गुरुवारी दुपारी सीआयडीच्या पथकाने प्रकरणांशी संबंधित दस्तऐवज ताब्यात घेतले. या प्रकरणाची माहिती मानवाधिकार आयोगालाही देण्यात आली आहे.

पीएसआयसह तिघांची तडकाफडकी बदली

पारडीतील घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस उपनिरीक्षकासह मुकेश ढोबळेसह तिघांची तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली. पीएसआय मुकेश ढोबळे, शिपाई नामदेव चरडे व आकाश शहाणे, अशी बदली करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांचीही भूमिका तपासण्यात येणार आहे.

पारडीत तणावपूर्ण वातावरण

मनोजवर पोलिस बंदोबस्तात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर मात्र, नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले. संतप्त गर्दीला बघून पोलिस आयुक्तांनी अजनी, इमामवाडा, सक्करदरा, कळमना, वाठोडा, जरीपटका, लकडगंज, कपिलनगर आणि गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

loading image