esakal | nagpur : उकिरड्यामुळे नागरीक भोगताहेत नरकयातना
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

उकिरड्यामुळे नागरीक भोगताहेत नरकयातना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उत्तर नागपुरातील पाचपावली परिसरात ठक्करग्राम येथील दुर्गामंदिराजवळ उभे राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने नरकात आल्याचा भास होतो. दुर्गंधी येणारे अन्नपदार्थ, सॅनिटरी नॅपकिन्स, मोकाट फिरणाऱ्या बकऱ्या, मांजरी, घुशी, विष्ठा अशी सर्व प्रकारची घाण या मोकळ्या भुखंडावर बघायला मिळते. येथून जायचे असेल तर नाकाला रुमाल लावल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बाजूलाच सार्वजनिक शौचालय आहे.

हे शौचालय आता वापरात नाहीत, परंतु या भागातून आल्यास येथे डुक्करवाडी दिसेल, बकऱ्या चरताना दिसतील. हे सारे किळसवाणे दृश्य नजरेस पडते. अशी व्यवस्था येथील व्यवस्थेनेच गरिबांच्याच वस्तीत का निर्माण केली आहे, असा सवाल या भागातील नागरिक विचारताहेत. या ठिकाणी समाजभवन तयार करावे यासाठी महापालिकेला निवेदन देण्यात आले आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनाही निवेदन दिले.

या घाणीने माखलेल्या परिसरात शेकडो कुटुंब राहातात. घाणीमुळे येथे डास व किडे तयार होतात. पाण्याचे डबके साचले असते. डासांची उत्पत्तीस्थाने तयार होतात. शहरात सध्या डेंगीची साथ सुरू आहे. अशावेळी घाण स्वच्छ करण्यासाठी कुणीही येत नाही. यामुळेच अशा उकिरडे असलेल्या भागात राहाणे नशिबाची देण आहे, असे समजून येथे राहावे लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी सकाळी निघतात आणि वस्तीत आल्यानंतर मात्र आनंदाने या घाणीमुळे होणाऱ्या आजाराच्या नरकयातनाही भोगत असतात. शेकडो वेळा वाचनालय उभारण्यासंदर्भात निवदेन दिलीत. मात्र झोन कार्यालयाने या सर्व निवेदनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

''पाचपावली परिसरातील ठक्करग्राम परिसरात मोठ्या प्रमाणात सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. या भागातील महापालिकेच्या शाळा बंद पडल्या आहेत. सफाई कुटुंबीयांची वस्ती स्वच्छ असावी. मात्र याकडे नागपूर महापालिकेचे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहे. याचा वापर होत नाही. त्याचा उकिरडा तयार झाला. हे शौचालय तोडून येथे समाजभवन तयार करण्याची गरज आहे.''

-प्रदीप हजारे, सामाजिक कार्यकर्ता, ठक्करग्राम

पाचपावली ठक्करग्राम परिसरातील वापरात नसलेले शौचालय तोडण्यात यावे. येथे समाजभवन झाल्यास लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. अशा उपक्रमाचे आयोजन करण्यावर भर देता येईल. कौशल्यविषयक शिक्षण-प्रशिक्षण वर्ग सुरू करता येतील. यातून लहान मुलांवर चांगले संस्कार होतील. शिक्षणाचा ध्यास मुलांमध्ये निर्माण होल. या मोकळ्या भूखंडावर मुलांसाठी ‘ग्रीन जीम’ लावता येईल.

-प्रीती हजारे, नजजागृती संस्था, पाचपावली

loading image
go to top