
राष्ट्रवादीच्या मिशन ५०ला काँग्रेसचा अडथळा
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या एकूण ५० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. शुक्रवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि नागपूरचे संपर्क नेते दिलीप वळसे पाटील यांना याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली. मात्र यात अडचण काँग्रेसची आहे.
स्थानिक निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लाढव्या यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे एकमत आहे. आपण यास सहमत असल्याचे पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. या संदर्भात आपसात चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. नागपूरची राजकीय परिस्थिती बघता शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेत्यांची यावर सहज सहमती होईल. मात्र अडचण काँग्रेसची आहे. एक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीसाठी ५० जागा सोडण्याची तयारी त्यांची नाही. काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाचे आपसात मुळीच पटत नाही.
माजी पालकमंत्री नितीन राऊत यांचा अपवाद वगळता शिवसेनेचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्यासोबत चर्चा करायला कोणी तयार होणार नाही. राऊत आता पालकमंत्री नाहीत. त्यामुळे त्यांना या चर्चेसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कितपत महत्त्व देतात हासुद्धा प्रश्नच आहे. काँग्रेसचे २९ नगरसेवक मागील निवडणुकीत निवडून आले होते. आता २८ शिल्लक राहिले आहेत. काँग्रेसची व्होटबँक बऱ्यापैकी शाबूत असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी फार-फार तर २५ जागा सोडण्याची तयारी नेत्यांची आहे. राज्यात सत्तापरिवर्तनाचा फटकाही महाविकास आघाडीला बसणार आहे. हे बघता राष्ट्रवादी आणि शिवसेनेला छोट्या-मोठ्या संघटनांची मोट बांधून एकत्रित लाढावे लागेल असे दिसते.
पूर्ववर दावा ठोकणार ?
नागपूर शहराचे विधानसभेत प्रतिनिधित्व असावे असे शरद पवार यांचे म्हणने आहे. यापूर्वीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. मात्र चर्चेचा शेवट झाला नाही. याचा फायदा काँग्रेसने घेतला. मात्र यावेळी कुठल्याही परिस्थितीत पूर्व नागपूरसाठी भांडण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. हीच बाब काँग्रेसला खटकत आहे. सतीश चतुर्वेदी यांनी या मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसतर्फे अभिजित वंजारी आणि पुरुषोत्तम हजारे यांनी निवडणूक लढली आहे. वंजारी यांच्याकडेच काँग्रेसने या मतदारसंघाचे पालकत्व सोपवले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस सहजासहजी सोडण्याची शक्यता नाही.
Web Title: Congress Obstructs Ncps Mission 50 Planning For Nagpur Municipal Corporation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..