esakal | Nagpur : दीड वर्षांपासून स्वीमिंग पुलांना लॉक!
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : दीड वर्षांपासून स्वीमिंग पुलांना लॉक!

Nagpur : दीड वर्षांपासून स्वीमिंग पुलांना लॉक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे गेल्या १८ महिन्यांपासून उपराजधानीतील जलतरण तलाव बंद असून, खेळाडूंचा सराव पूर्णपणे थांबला आहे. प्रॅक्टिसअभावी त्यांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होत आहे. आता परिस्थिती नॉर्मल होऊ लागल्याने प्रॅक्टिसला परवानगी द्यावी, अशी मागणी जलतरणपटू व प्रशिक्षकांनी प्रशासनाला केली आहे.

गतवर्षी कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर मार्चमध्ये पहिल्यांदा लॉकडाउन लागले होते. तेव्हापासून शहरातील सर्व जलतरण तलाव बंद आहेत. मधल्या काळात आउटडोअर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजला हिरवी झेंडी देण्यात आली. मात्र जलतरणपटू अजूनही प्रतिक्षाच करीत आहे. जवळपास १८ महिन्यांपासून जलतरणपटू प्रॅक्टिसविना एकेक दिवस काढत आहेत. पावसाळा संपत आल्याने सीझन आरंभ होत आहे. हळूहळू जलतरण स्पर्धादेखील सुरू होत आहेत. त्यामुळे खेळाडूंना सराव मिळणे आवश्यक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथे जलतरणाला परवानगी मिळाली असून, इतरही राज्यांमध्ये स्वीमिंग पूल सुरू झाले आहेत. नागपुरात अजूनही यासंदर्भात निर्णय घेण्यात आला नाही. त्याचा फटका खेळाडूंना बसतो आहे. पुढील महिन्यात बंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी नुकतीच पुण्यात निवड चाचणी झाली. मात्र सरावाअभावी नागपूरच्या खेळाडूंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. घरगुती फिटनेस व १०-१५ दिवस अंबाझरी तलावावर स्वीमिंग करून काही जलतरणपटू चाचणीत सहभागी झाले होते. मात्र पुरेशा तयारीअभावी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे भविष्यातील स्पर्धांची तयारी करता यावी, यासाठी लवकरात लवकर स्वीमिंग पूल सुरू होणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मंदिरे उघडताय, मग स्वीमिंग पूल का नाही?

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने येत्या नवरात्रापासून देवदर्शनासाठी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर जलतरण तलावांनाही सोशल डिस्टन्सच्या अटींवर परवानगी द्यावी, अशी मागणी काही खेळाडू व प्रशिक्षकांनी प्रशासनाकडे केली आहे.

पुण्यासह देशभरातील अनेक शहरांमध्ये जलतरणाला परवानगी मिळाली आहे. प्रॅक्टिसपाठोपाठ स्पर्धाही सुरू झाल्या आहेत. सराव बंद असल्याने नागपूरच्या अनेक खेळाडूंना फटका बसतो आहे. त्यामुळे मनपानेही यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे.

-डॉ. प्रवीण लामखाडे, जलतरण प्रशिक्षक

loading image
go to top