महापालिकेच्या अर्थसंकल्पाला कोरोनाची बाधा !

Corona hinders municipal budget!
Corona hinders municipal budget!

नागपूर : महापालिकेच्या गेल्या दोन दशकांच्या काळात प्रथमच मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात घट करण्यात आली. एवढेच नव्हे यंदा अपेक्षित उत्पन्नाबाबतही अति आत्मविश्वास दाखविण्याऐवजी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी २७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारपरिषदेत झलके यांनी कोरोनामुळे उत्पन्नात घट झाल्याने अंदाजपत्रक वास्तविक स्थितीवर आधारित तयार करण्यात आल्याचे नमूद केले. 

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला महापालिकेचा अर्थसंकल्प झलके यांनी आज ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सभागृहात मांडला. २०२०-२१ या वर्षासाठी २५०० कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त करीत मागील वर्षीचे शिल्लक २३१ कोटींसह झलके यांनी एकूण दोन हजार ७३१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. तुकाराम मुंढे यांनी पैसा नसल्यावरून रोखलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी झलके यांनी ३४७ कोटींची तरतूद करीत विकास कामांचा मार्ग मोकळा केला.

कोरोनामुळे नागरिकांच्या उत्पन्नालाही फटका बसला. परिणामी विविध करातून महापालिकेचे निव्वळ उत्पन्न केवळ ७५७ कोटींवर थांबले. त्यामुळे थकीत रक्कमही वाढली. थकीत रकमेवर दोन टक्के दंड आकारणी करण्याऐवजी ती माफ करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यातून कोट्यवधींचा फटका महापालिकेला बसणार आहे.

कोरोनामुळे चालू वर्षात वसुलीबाबत झलके साशंक असल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदा त्यांनी मालमत्ता करातून वसुलीचे लक्ष्यही २२३ कोटी रुपये ठेवले. वेगवेगळ्या विभागाकडून उत्पन्नाच्या मोठ्या अपेक्षा करण्याचेही त्यांनी टाळले. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्पही कोरोनाबाधित असल्याचे दिसून येत आहे.

उत्पन्न वाढीसाठी त्यांनी थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जुनाच ‘वन टाईम सेटलमेंट़'चा फॉर्म्युला वापरला असून थकीत मालमत्ता करावरील दोन टक्के दंडाची रक्कम माफ करण्याचा मानस व्यक्त करीत नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

अनुदानावर भिस्त
यंदाही महापालिकेची भिस्त अनुदानावर आहे. अनुदानातून १४११ कोटींची अपेक्षा झलके यांनी केली आहे. यात जीएसटीच्या १२३६ कोटींचा समावेश आहे. एप्रिलपासून आतापर्यंत ७०० कोटींचे जीएसटी अनुदान महापालिकेला मिळाले. त्यामुळे पुढील पाच महिन्यात जीएसटीचे पाचशे कोटी व इतर अनुदानातून सातशे कोटी मिळतील.

यंदा विविध योजनांवर २७३० कोटींचाच खर्च
जुने प्रलंबित रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी ३४७ कोटींची तरतूद झलके यांनी केली. याशिवाय बाजारांचा विकास, समाज भवनाची निर्मिती, पथदिवे बदलणे, पार्किंग व्यवस्था, प्रभाग विकासासाठी प्रति नगरसेवक २० लाखांची तरतूद, अग्निशमन विभागाच्या बळकटीकरणासाठी ३१ कोटींसह एकूण २ हजार ७३० कोटी खर्च केले जाईल, असा दावा झलके यांनी केला.

वंदे मातरम् उद्यानाची निर्मिती
शहराच्या मध्यभागी एम्प्रेस मिल परिसरात एक लाख चौरस फूट'जागेवर वंदे मातरम् उद्यानाची निर्मिती करण्याचा मानस झलके यांनी व्यक्त केला. दिल्लीतील गेट वे ऑफ इंडियावरील सैनिक स्मारकाच्या धर्तीवर हे उद्यान तयार करण्यात येणार आहे. येथे शहीद सैनिकांची माहिती देणारे भित्तिचित्र तयार करण्यात येईल. दिघोरीत २० हजार चौरस फूट जागेवर गणिती उद्यानाची निर्मितीचीही घोषणा त्यांनी केली.

 
कोरोनाच्या काळात संतुलित व वास्तविक अर्थसंकल्प सादर करण्याची कसरत झलके यांनी दाखविली. मालमत्ता तसेच पाणी कराच्या थकीत रकमेवरील दंड माफ करण्याचे मोठे मन त्यांनी दाखविलेच, शिवाय महापालिकेकडील देणी देण्याचीही तरतूद त्यांनी केली.
संदीप जोशी, महापौर.

अर्थसंकल्पात केवळ महापालिकेच्याच कलमांचा भरणा आहे. कुठेही आकडे दिसत नाही. सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प काल्पनिक असून वास्तव्यात येणार नाही. तुकाराम मुंढे गेले तरी त्यांना टारगेट करणारा हा अर्थसंकल्प आहे.
प्रफुल्ल गुडधे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com