महामेट्रो आणणार ऑटोचालकांच्या संसाराची गाडी रुळावर; मेट्रोला देणार फिडर सेवा

Auto driver will provide feeder service to Metro
Auto driver will provide feeder service to Metro

नागपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन, त्यानंतरच्या काळातही प्रवासी बसविण्यावरील मर्यादेमुळे ऑटोचालकांच्या संसाराच्या गाडीपुढे ‘ब्रेकर्स' निर्माण झाले आहे. त्यांच्यापुढे आर्थिक संकट निर्माण झाले. महामेट्रोने या ऑटोचालकांच्या संसाराची गाडी रुळावर आणण्यासाठी ऑटो मेट्रोच्या फिडर सेवेत दाखल करून घेतले. त्यामुळे ऑटोचालकांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.

कोरोनाच्या संक्रमणामुळे साडेसहा महिन्यांपासून बंद असलेली मेट्रो सेवा पुन्हा सुरू झाली. पुढे मेट्रोतून प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. महामेट्रोने तिकीट दरात ५० टक्के सूट दिली आहे. मेट्रोचा वापर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात करावा, या पार्श्वभूमीवर ऑटोला फिडर सेवेत सामील करून घेण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. या अनुषंगाने मेट्रो भवनात टायगर ऑटो संघटनेसोबत महामेट्रोने बैठक घेतली. यावेळी महामेट्रोने फिडर सेवेचे सादरीकरण केले. मेट्रो व ऑटोचालक एकमेकांना कसे सहकार्य करू शकतील, हेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सध्या १६ मेट्रो स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू आहे. या मेट्रो स्थानकांवर ऑटोचालक संघटनेतील एक ऑटो चालक मेट्रो मित्र म्हणून कार्य करेल. महा मेट्रोने नवीन उदयोन्मुख कंपनी भारत राईड्ससोबत मेट्रो व ऑटो फिडर सेवेबाबत ॲप तयार करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ॲपद्वारे मेट्रो प्रवाशांना त्यांच्या घरी ऑटो उपलब्ध होईल. प्रवाशांंना सहजपणे मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचता येणार आहे.

मेट्रोने प्रवास करणारा व्यक्ती या ॲपद्वारे स्टेशनच्या नजीक असलेल्या ऑटोरिक्षाशी संपर्क साधून पुढील घर किंवा कार्यालयापर्यंतचा प्रवास करू शकतो. यातून ऑटो चालकांना प्रवासी जास्तीत जास्ती प्रवासी मिळून त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. ॲप निःशुल्क असून, केवळ ऑटोच नव्हे तर या माध्यमाने जवळ असलेले स्वच्छतागृह, औषधांची दुकाने, खानावळ, मेट्रो स्टेशन, बस स्थानक, पर्यटन स्थळासंबंधी माहिती ॲपमधून मिळेल.

दोन हजार ऑटोचालकांना जोडणार

मेट्रो व ऑटोचालकांच्या बैठकीत ऑटो संघटनेनेही या प्रस्तावाचे स्वागत केले. येत्या काळात शहरातील दोन हजार ऑटो चालकांना मोहिमेशी जोडण्यात येणार असल्याचा मानस महामेट्रो व संघटनेने व्यक्त केला आहे.

ऑटोचालकांनी संधीचा लाभ घ्यावा
मेट्रोने उपलब्ध करून दिलेल्या संधीमुळे मेट्रोसह ऑटोचालकांनाही फायदा होणार आहे. याशिवाय प्रवाशांनाही उत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. त्यामुळे जास्तीत जास्त ऑटोचालकांनी संधीचा लाभ घ्यावा.
- विलास भालेकर,
अध्यक्ष, टायगर ऑटो संघटना

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com