राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कोरोना प्रयोगशाळा 

file photo
file photo

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळेला मान्यता मिळाली. यापाठोपाठ आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातही अशाच प्रकारच्या प्रयोगशाळेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रयोगशाळेला आयसीएमआरची मान्यता मिळाली असून, सोमवारी (ता. २४) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रयोगशाळेत मेयो रुग्णालयातून आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेत ३० नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

देशात कोरोना विषाणूचे संक्रमण कोणालाही होऊ नये म्हणून टाळेबंदीस सुरुवात करण्यात आली. या काळात वैद्यकीय क्षेत्रातील संस्था सोडले तर मोजकेच शैक्षणिक संशोधन करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुढाकार घेत त्यांच्या इन्क्‍युबेशन केंद्रामध्ये कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा तयार केली आहे. आयसीएमआरकडून त्यांना मान्यता मिळताच विद्यापीठात प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. सहा महिन्यांपासून त्यासाठी मराठवाडा विद्यापीठाने पाठपुरावा केला होता. याच पार्श्‍वभूमीवर नागपूर विद्यापीठही अशा प्रयोगशाळा सुरू करावी यासाठी ‘आयसीएमआर’ला प्रस्ताव पाठविण्यात आला. यासाठी मेंटार म्हणून नागपुरातील ‘एम्स’ने पुढाकार घेतला. त्यानुसार विद्यापीठाने जागा उपलब्ध करून देत इन्फ्रास्ट्रक्‍चर तयार केले.

आता बायोवेस्टची प्रोसेस सुरू असून जिल्हा प्रशासनाने त्यासाठी हिरवा कंदील दिला. यानंतर एम्सकडून सॅम्पल अप्रूव्ह करण्याचे काम सुरू करण्यात आले. हे सॅम्पल अप्रूव्ह केल्यावर ते ‘आयसीएमआर’कडे पाठविण्यात आले. त्याची गुणवत्ता प्रमाणित होताच विद्यापीठाच्या प्रयोगाशाळेला मान्यता मिळाली. यानुसार विद्यापीठात प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.

उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. नीरज खटी, डॉ. प्रफुल्ल साबळे, वित्त अधिकारी डॉ. राजू हिवसे उपस्थित होते. प्रयोगशाळेत राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉ. आरती शनवारे, रुसाचे समन्वयक डॉ.मनोज रॉय, डॉ. राजेंद्र काकडे, डॉ. अर्चना मून, डॉ. अभय देशमुख तर नोडल अधिकारी म्हणून डॉ. निशिकांत राऊत राहतील. याशिवाय डॉ. विजय तांगडे यांचा समावेश आहे. 

नागपूरसाठी ठरणार फायदेशीर 
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी अशा प्रयोगशाळेसाठी इन्क्‍युबेशन सेंटरला प्रस्ताव तयार करण्याचे सूचना केल्या होत्या. त्यानुसार या सेंटरमार्फत विद्यापीठाचे तज्ज्ञ प्राध्यापक बरोबर खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर आणि सुसज्ज प्रयोगशाळा आणि तज्ज्ञ असावे याकरिता प्रस्ताव तयार केला. कोरोना या साथीच्या आजाराच्या संकटकाळी नागपुरात कोरोना संशयित मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आजाराची चाचणी आणि आळा घालण्याकरिता मोठा फायदा होणार आहे. 

संपादन - मेघराज मेश्राम
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com