
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, नागपूरचं दाम्पत्य तयार करतंय कलात्मक वस्तू
कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, हा अनेकांसमोरचा प्रश्न आहे. मात्र, अशा टाकाऊमधून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा संकल्प प्राची जोशी आणि विनय जोशी दांपत्याने घेतला. त्यासाठी डिसेंबर २०२० ‘संकल्पना क्रिएशन प्रा. लि.’ या नावाने स्टार्टअप सुरू केले. इतरांसाठी टाकाऊ असलेल्या साहित्यातून जोशी दांपत्य सुंदर वस्तू, कलाकृती तयार करीत आहे.
प्राची यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण जालन्यात झाले. त्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या गव्हर्नन्मेंट पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुरुवातीपासून त्यांना टाकाऊपासून टिकाऊ सुंदर वस्तू तयार करण्याचा छंद होता. तो त्यांनी कायम ठेवला. वर्ष २०१४ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी २०१६-१७ या कालावधी एका इंग्रजी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले.
२०१७-१८ या दोन वर्षांत त्यांनी औरंगाबाद महापालिकेत कंत्राटी इंजिनिअर म्हणून सेवा बजावली. लग्न झाल्यानंतर त्या नोव्हेंबर २०१९ मध्ये नागपूरला आल्या. मात्र, त्यांनी लग्नानंतरही आपला छंद कायम ठेवला होता. यासाठी त्यांना त्यांचे पती विनय जोशी यांची व्यवसाय उभारण्यासाठी साथ मिळाली. यानंतर प्राची यांनी आपल्या छंदाला व्यवसायाची जोड देत ‘संकल्पना क्रिएशन प्रा. लि.’ हे स्टार्टअप सुरू करून व्यवसाय उभा केला.
फर्निचरच्या दुकानात शिल्लक राहिलेले प्लायवूड, लाकूड, लग्नाच्या शिल्लक राहिलेल्या पत्रिका, स्पंज शीट, लहान प्लॅस्टिकच्या बाटल्या त्यांचे झाकण, फोडलेले नारळ, जुन्या तारा, केबल्स, दगड असा विविध प्रकारचा कचऱ्यांतून जोशी दांपत्य सुंदर अशा कलाकृती तयार करीत आहेत. आपल्या घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘टाकाऊतून टिकाऊ’चा पर्याय अधिक कल्पकपणे अवलंबून आपणही कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
छंदाला व्यवसायाची जोड देता येऊ शकते का, याचा प्राची जोशी आणि विनय जोशी यांनी अभ्यास केला. त्यांनी अनेक फर्निचर दुकानांना भेटी दिल्या. तेथे वेस्टेज फर्निचर मोठ्या प्रमाणात निघत असल्याचे लक्षात आले. ते त्यांनी जमा केले. लग्नानंतर अनेकांकडे लग्नपत्रिका शिल्लक राहत त्याही गोळा केल्यात. लहान प्लॅस्टिक बाटल्या, त्यांचे झाकण, फोडलेले नारळ, जुन्या तारा, केबल्स, रंगीत दगड याचा वापर करून त्यांनी की होल्डर, स्टेशनरी सेट, फ्रिज मॅग्नेट, युनिक होम डेकोर करणे, ऑर्गनिक सीड्स राख्या अशा विविध प्रकारच्या सुंदर वस्तू तयार केल्या. फेकलेल्या लाकडावर त्यांनी विविध आकाराचे सुंदर डिझाइन तयार केले. लाकूड, विविध प्रकारचे दगड, वाळलेल्या झाडाची फांदी वापरून की होल्डरचे डीझाइन बनविले. पाण्याच्या बॉटलची झाकणे, पाइन लाकूड यांचा वापर करून वस्तू तयार केल्या. त्याला ग्राहकांनी, दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
Web Title: Couple From Nagpur Is Creating Artistic Items From Waste To Durable Items Motivation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..