Nagpur Jail : मध्यवर्ती कारागृह ‘ओव्हर फ्लो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Jail

Nagpur Jail : मध्यवर्ती कारागृह ‘ओव्हर फ्लो’

नागपूर : जिल्ह्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. तसेच वाढत्या गुन्ह्यांबरोबरच गुन्हे उघडकीस येण्याची संख्या वाढल्याने अटक करण्यात येणाऱ्या आरोपींची संख्याही वाढली आहे. सध्या मध्यवर्ती कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांतील ३००३ आरोपी बंदिस्त आहेत. त्यामुळे कारागृहातील सर्वच बराकी ओव्हर फ्लो झाल्या आहेत. विशेष म्हणजे कारागृहाची क्षमता १८४० असताना आरोपींची संख्या ३००३ झालेली आहे.

लोकसंख्येच्या वाढीमुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यातच कोरोनाच्या लॉकडाऊननंतर समाजातील गुन्हेगारीही सतत वाढू लागलेली आहे. देशभरातील कारागृहांमध्ये कैदेत असलेल्या बंदिवानांची संख्या त्या-त्या कारागृहाच्या क्षमतेपेक्षा दुप्पट आहे. यावरून, समाजातील वाढती गुन्हेगारीच अधोरेखित होते. महाराष्ट्रासह नागपूरातील कारागृहांतील वास्तवही वेगळे नाही. यामुळे कारागृहातील बंदींना एकप्रकारे कोंडमाराच सहन करावा लागत आहे.

कारागृहाच्या आत न्यायालयीन बंदी म्हणजेच कच्चे कैदी आणि गुन्हा सिद्ध झालेल्या आरोपींसाठी पक्के कैदी यांच्यासाठी वेगवेगळे बॅरेक आहेत. मोक्का आरोपातील न्यायबंदींचे बॅरेक जवळ जवळच आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहात डॉन अरुण गवळी यांच्यासह अनेक गंभीर गुन्ह्याचे आरोपी आहेत. सध्या तो पॅरोलवर आहे. या कारागृहातील काही वर्षापूर्वी आरोपी फरार होण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. हे कारागृह कायम टोळीयुद्ध, कैदयांमध्ये जोरदार हाणामारीने कायम चर्चेत असते. मोका न्यायाधीन, नक्षलवादी,

मध्यवर्ती कारागृह ‘ओव्हर फ्लो’

सश्रम कारावास, एनडीपीएस शिक्षा, जन्मठेप शिक्षा झालेले आरोपी आहेत. या कारागृहातच १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर चर्चेत आले होते.

बॅरेकमध्येही दुप्पट बंदी

कारागृहांमध्ये बंदिवानांना निवासासाठी बॅरेक असतात. एका बॅरेकची क्षमता वेगवेगळी असली तरी साधारणत: ५० ते ६० बंदी त्याठिकाणी राहू शकतील इतकीच असते. परंतु कारागृहात दाखल होणाऱ्या बंदीमुळे एकेका बॅरेकमध्ये क्षमतेच्या दुपटीपेक्षा अधिक बंदींना रहावे लागते. यातून अनेक प्रकारच्या समस्या उद्‌भवण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

मे २०२२ पर्यंतचे बंदिवान

विदेशी बंदी ०४

चौकशीअधिन बंदी ९९१

३०२ न्यायाधीन बंदी ५६३

एमपीडीएबंदी १८

सश्रम कारावास शिक्षाबंदी ३४७

एनडीपीएस शिक्षाबंदी २३

जन्मठेप शिक्षाबंदी ४२०

मृत्यूदंड शिक्षाबंदी ०८

एनडीपीएस न्यायाधीन बंदी १२६

लालपट्टी (भगोडा) बंदी ३०

मोका न्यायाधीन बंदी १६२

नक्षलवादी बंदी ७७

रात्रपहारेकरी १९

सिद्धदोष अन्वेक्षक (वॉर्डर)१३

खुले कारागृह शिक्षाबंदी २९

एकूण ३००३

नागपूर मध्यवर्ती कारागृहाची क्षमता १८४० आहे. मात्र, सध्या किती बंदिस्त आहे याची अद्यावत माहिती जवळ नाही, तब्बेतीच्या कारणामुळे अधिक बोलू शकत नाही.

- अनुप कुमरे,कारागृह अधिक्षक

विशेष महिला कारागृहातही क्षमतेपेक्षा अधिक बंदिवान

महिला गुन्हेगारांसाठी असलेल्या मुंबईतील विशेष महिला कारागृहाची अधिकृत बंदीसंख्या २६२ इतकीच आहे. परंतु, याठिकाणीही ३७० महिला बंदींची संख्या आहे. क्षमतेपेक्षा हे प्रमाण १४१ टक्के इतके आहे. अशीच वा यापेक्षाही अधिकची स्थिती राज्यभरातील जिल्हा कारागृहांची आहे. राज्यातील बहुतांशी जिल्हा कारागृहांमध्येही क्षमतेपेक्षा अधिकच बंदीवान आहेत.

Web Title: Crime News Nagpur Central Jail Overflow Unemployment Youth Police Judiciary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..